मेस्सीचे जेतेपद दोन पावलावर, क्रोएशियाचे भक्कम मिडफील्ड भेदण्याचे मेस्सी व अर्जेन्टिनासमोर आव्हान,
वृत्तसंस्था/ अल खोर, कतार
क्रोएशियाने ब्राझीलच्या नेमारचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न उद्ध्वस्त केल्यानंतर आता अर्जेन्टिनाच्या मेस्सीवर तशीच वेळ आणण्याची आशा बाळगून आहेत. आज मध्यरात्री 12.30 वाजता अर्जेन्टिना व क्रोएशिया यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील पहिली उपांत्य लढत होत असून जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी मेस्सी दोन पावलांच्या टप्प्यावर आला आहे.
2018 मध्ये झालेल्या स्पर्धेत क्रोएशियाने उपविजेतेपद मिळविले होते. आता त्यांच्यासमोर मुख्य अडथळा आहे तो अर्जेन्टिनाचा. पण अर्जेन्टिनाही बऱयाच काळाचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची इच्छा बाळगून उतरणार असल्याने क्रोएशियाला त्यांना नमविणे सोपे जाणार नाही. मेस्सीला आजवर जेतेपदाने हुलकावणीच दिली असल्याने या शेवटच्या स्पर्धेत ते साकार करण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करणार हे निश्चित आहे. मागील वेळेस अंतिम फेरी गाठूनही क्रोएशियाला फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागल्याने पहिल्या जेतेपदापासून वंचित रहावे लागले होते. ती कसर यावेळी भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पण त्याआधी त्यांना मोठा अडथळय़ाला सामोरे जावे लागणार आहे.

‘आम्हाला कोणाची भीती बाळगण्याचे कारण नाही. त्याऐवजी सर्वोत्तम खेळ करण्याकडे आम्ही लक्ष पुरविले पाहिजे,’ असे क्रोएशियाचा डिफेंडर जोसिफ जुरानोविक म्हणाला. ‘आमची एकसंधता व एकता हे आमच्या यशाचे गुपित आहे. आम्ही सर्वजण एक कुटुंब असल्याप्रमाणे वागतो व खेळतो, हे वास्तव आहे,’ असेही तो म्हणाला. उपांत्यपूर्व फेरीत निर्धारित व जादा वेळेत 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर क्रोएशियाने ब्राझीलचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा फरकाने पराभव केल्यानंतर ब्राझीलच्या नेमारच्या डोळय़ात अश्रू आले होते.
मेस्सी या स्पर्धेत जिंकण्याच्या आशेनेच प्रेरित झाला असून त्याच्या फॉर्ममुळेच अर्जेन्टिनाने उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळविले आहे. त्याने आतापर्यंतच्या पाच सामन्यांत 4 गोल नोंदवले आहेत. याशिवाय त्याने काही गोल नोंदवण्यासाठी साहय़ही केले आहे. नेदरलँड्सविरुद्ध त्याने मोलिनाला गोल करण्यासाठी निर्माण करून दिलेली संधी हा मेस्सी मॅजिक संस्मरणीय क्षण होता, असे मानले जाते. अर्जेन्टिनाला तिसरे वर्ल्ड कप जेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली असून 1986 नंतरचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा त्याने निर्धारच केला आहे. 2014 ब्राझीलमध्ये झालेल्या स्पर्धेत अर्जेन्टिनाने अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत जर्मनीने त्यांना 1-0 असे हरविल्यामुळे मेस्सीचा स्वप्नभंग झाला होता. यावेळी त्याची भरपाई करून ट्रॉफी उचलण्याचा त्याचा व त्याच्या संघाचा निर्धार आहे.
लुसैल स्टेडियवर होणाऱया या सामन्याआधी क्रोएशिया संघ शांत असल्याचे दिसून येते. ‘निदान आता तरी मेस्सीला रोखण्यासाठी आम्ही कोणतीही निश्चित योजना आखलेली नाही,’ असे क्रोएशियाचा स्ट्रायकर ब्रुनो पेटकोविकने सांगितले. ‘सर्वसाधारणपणे आम्ही कोणत्याही एका खेळाडूला नव्हे तर संपूर्ण संघाला रोखण्याचा प्रयत्न करतो. अर्जेन्टिना म्हणजे फक्त मेस्सी नव्हे. त्यामुळे आम्ही एका खेळाडूसाठी योजना किंवा तशा प्रकारचे डावपेच आखत नाही,’ असेही तो म्हणाला.
लुका मोड्रिकच्या नेतृत्वाखाली क्रोएशियाचे भक्कम मिडफील्ड हे बलस्थान आहे. त्यांचे प्रशिक्षक डॅलिक यांनी क्रोएशियाचे मिडफील्ड हे जगातील सर्वोत्तम असल्याचे ब्राझीलला हरविल्यानंतर म्हटले होते. या मिडफील्डने नेमार व ब्राझीलला ‘पॅरालाईज्ड’ केले होते, असेही त्यांनी म्हटले होते. मॅटेव कोवासिक, लुका मोड्रिक, मार्सेलो ब्रोझोविक हे क्रोएशियन मिडफील्ड इतिहासातील सर्वोत्तम मिडफील्ड आहे, असे मला वाटते, असे जुरानोविकने सांगत त्यांच्या म्हणण्याला पुस्ती जोडली.
आज पहिली उपांत्य लढत
अर्जेन्टिना वि. क्रोएशिया
स्थळ ः लुसैल स्टेडिय, अल खोर
वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.









