संजय पाटील / हातनूर
द्राक्ष पंढरीचा तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या तासगाव तालुक्यातील हातनूरसह परिसरात सोमवारी दुपारपासून मेघगर्जनेसह गारासह मोठा पाऊस झाला. गराचा पाऊस झाल्यामुळे द्राक्ष बागेतील पाने फाटली असून अनेक बागांच्या मोठया प्रमाणावर काड्याही मोडून झाडे भुंडी झाली आहेत. नुकताच झालेला द्राक्षहंगाम वाया गेल्याने आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा लाखो रुपये खर्च करून जपलेल्या द्राक्ष बागा सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहेत.
फळ पिकासाठी कडी तयार करण्यासाठी प्रयत्नशील आसलेल्या शेतकरी मोठया संकटात सापडला आहे. पाऊस गारा व मोट्या प्रमाणात असलेल्या वादळी वाऱ्याने कड्यांची पाने फाटली व अधिकच्या काड्या मोडून पडल्यामुळे बागा ठेवाव्यात की काडून टाकाव्यात अशी अवस्था झाली आहे. कड्याना जखमा झाल्याने महागडी औषधे मारूनही काही उपयोग होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अति प्रमाणात सुसाट वाऱ्यासह पाऊस व गारा झाल्याने मोठया प्रमाणात द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे, आजून काही भागात मोठया प्रमाणात द्राक्षेबागा मालासह शिल्लक आहेत. उशिरा फळ छाटणी घेतलेल्या बागावर कोट्यवधी रुपयांचा माल शिल्लक आहे. आधी द्राक्षाचा संपूर्ण हंगाम व्यापाऱ्यांनी दर पडल्यामुळे पूर्णतः नुकसानीत गेला व आता पावसाने गारा व वाऱ्याने हाहाकार माजवत येणारे नवीन वर्षालाही खोडा घातला आहे. ऊस व इतर पिकांना हा पाऊस समाधानकारक असला तरी द्राक्ष बागादारांच्या दृष्टीने नवीन वर्षाची सुरुवात ही निराशजनकच म्हणावी लागेल. सलग चौथ्या वर्षी द्राक्षबागायतदारांना कर्जबाजारी व नुकसानीला तोंड द्यावं लागत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून भयानक उन्हाचा तडाका, आणि दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने द्राक्षबागायतदार शेतकरी चिंतेत सापडला आहे. आता गारामुळे व काड्या मोडल्यामुळे होणाऱ्या जखमा त्यातून त्यावर येणारे रोग यामुळे शेतकरी वर्गाला महागडी औषधे फवारावी लागनार आहेत. बाजारात मिळणारी रोगप्रतिबंधक औषधे कुचकामी ठरत आहेत. यामुळे द्राक्षबागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यातील सुमारे 7500 ते 8 हजार एकर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. दि. 25 मार्च ते एप्रिल अखेर या कालावधीत द्राक्षबागांची खरडछाटणी होत असते. आता तालुक्यातील काही बागांचे क्षेत्र हे विरळणी व शेंडा मारणे सबकेन करणे अवस्थेत आहे. हातनुर सह मांजर्डे विसापूर पेड भागातील अनेक द्राक्ष बागांच्या काड्या मोडून कड्यानं गाराने जखमा होऊन झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे.जखमा झालेल्या काड्या काडून टाकाव्या लागतात त्यामुळे झाडावर पीक काड्या कमी राहतात त्याचा परिणाम येणाऱ्या हंगामात माल कमी येतो तर काही बागा फेल जाण्याची शक्यता असते.
गारांचा पाऊस बंद झाला नाही तर द्राक्ष बागांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय औषधे, खते आणि मजुरांवर केलेला लाखो रुपये खर्च डोक्यावर कर्ज म्हणून राहणार आहे, या भितीने शेतकरी हादरले आहेत. बाजारात मिळणार्या औषधांच्या दर्जावर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे बऱ्याच कृषी दुकानात औषधांचे दर वेगवेगळे आहेत.सर्वच औषधांचे दर वाढल्याचे सांगून औषध दुकानदार द्राक्ष बागाची मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत . त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
निसर्गाने दिले तर व्यापारी व दुकानदार लुटतात. त्यातूनही शेतकरी मोठ्या जिद्दीने उभा राहू पाहतो तर निसर्गाच्या कृपेने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजले की काय अशी म्हणायची वेळ द्राक्ष बागातदार शेतकऱ्यावर आली आहे. हेही दिवस जातील अशी आशा बाळगत शेतकरी द्राक्ष बागायतदार मोठ्याआशेनं पुन्हा उभारून शेतीमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावत कामाला लागत असतो. मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस शेतीसाठी अतिशय महत्त्वाचाच आहे परंतु अवकाळी ही शेतकऱ्याची कळा घालवणारी नसावी ,अशी प्रार्थना बागायतदारातून वरुण राजाकडे होत आहे.