फ्रुट मार्केटजवळील खड्ड्यावरून नागरिकांचा संतप्त सवाल : खड्डा पाण्याने भरल्याने ठरतोय धोकादायक
बेळगाव : गांधीनगरच्या फ्रुट मार्केटनजीक भुयारी गटार योजनेसाठी खोदकाम करणाऱ्या दोन कामगारांचा मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झाल्याची घटना महिन्याभरापूर्वी घडली होती. दोन निष्पापांचा जीव गेला तरी प्रशासनाला अद्याप शहाणपणा आलेला दिसत नाही. या दहा ते बारा फूट खड्ड्यामध्ये सध्या पावसाचे पाणी भरले असून सर्व्हिस रोडलगतच हा खड्डा असल्याने प्रशासन अजून काहींचे बळी जाण्याची वाट पहात आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महांतेशनगर ब्रिजपासून फ्रुट मार्केटपर्यंतच्या रोडवर भुयारी गटार योजनेसाठी खोदकाम करण्यात आले होते. हे खोदकाम सुरू असताना 16 एप्रिल रोजी मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर येथील काम थांबवण्यात आले होते. वास्तविक पाहता हे काम पूर्ण करून खड्ड्यामध्ये माती भरणे गरजेचे होते. परंतु, अद्याप त्या ठिकाणी दहा ते बारा फुटांचा खड्डा आहे त्याच स्थितीत आहे. तसेच मागील दोन दिवसात झालेल्या वळिवाच्या पावसाने त्यामध्ये जमिनीलगत पाणी भरले आहे.
खड्डा भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरच हा खड्डा खणण्यात आला आहे. वेगाने येणाऱ्या वाहनचालकाला रात्रीच्या वेळी खड्डा निदर्शनास न आल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. या रस्त्यावरून शहरात येणारी वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. जवळच फ्रुट मार्केट व हेस्कॉमचे ग्रामीण उपविभागीय कार्यालय असल्याने नागरिकांची ये-जा सुरू असते. परंतु, मागील महिनाभरात हा खड्डा भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे.
बॅरिकेड्स लावणे गरजेचे
अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार विभागाकडून काम सुरू होते. परंतु, सद्यस्थितीला या ठिकाणी कोणतेही काम सुरू नसून किमान बाजूने बॅरिकेड्स लावणे गरजेचे आहेत. अजून काही निष्पापांचा बळी गेल्यानंतरच बेळगावच्या प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.









