भारतीयांसमोर खडतर आव्हान
वृत्तसंस्था/ वांता (फिनलंड)
आज मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या आर्क्टिक ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाला खडतर आव्हानाला तोंड द्यावे लागणार असून लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत या हंगामातील जेतेपदासाठीचे आपले प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून चालू ठेवतील.
या हंगामात हाँगकाँग ओपनमध्ये उपविजेता राहिलेल्या लक्ष्यला पहिल्या फेरीत जपानच्या पाचव्या मानांकित कोडाई नारोकाविऊद्ध कठीण आव्हानाला सामोरे जावे लागेल. 2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सेनला नारोकाला रोखण्यासाठी आक्रमकता आणि संयम यांच्यात संतुलन राखावे लागेल, नारोका बचावात मजबूत आहे आणि खराब खेळाचा तो लगेच फायदा घेईल.
यंदा मलेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीपर्यंत जोरदार मजल मारलेल्या श्रीकांतची गाठ सलामीला रासमुस गेमकेशी पडेल. संपूर्ण हंगामात सातत्य कायम राखण्याच्या दृष्टीने संघर्ष करत आलेल्या या अनुभवी भारतीय खेळाडूला मुसंडी मारण्यासाठी रणनीतीच्या दृष्टीने विविधतेसह आपले कौशल्य पणाला लावावे लागेल. भारताच्या युवा खेळाडूंमध्ये यावर्षी यूएस ओपन सुपर 300 मध्ये पहिले बीडब्ल्यूएफ जेतेपद पटकावणारा आयुष शेट्टी थायलंडच्या अव्वल मानांकित कुनलावूत वितिडसारनशी एक कठीण सलामीचा सामना खेळेल.
नुकत्याच मकाऊ ओपन सुपर 300 मध्ये उपांत्य फेरी गाठलेल्या थरून मन्नेपल्लीचा सामना सातवा मानांकित फ्रेंच खेळाडू टोमा ज्युनियर पोपोव्हशी होईल. हा सामना थरूनचा संयम आणि फटक्यांच्या निवडीची चाचणी घेईल. या वर्षी इंडिया ओपनमध्ये क्वार्टरफायनलमध्ये पोहोचणे ही ज्याची सर्वोत्तम कामगिरी आहे तो किरण जॉर्ज जपानच्या कोकी वतानाबेशी लढेल, तर एस. शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यम फ्रान्सच्या तिसऱ्या मानांकित क्रिस्टो पोपोव्हशी लढणार असून भारतीय खेळाडूसाठी ही एक कठीण लढत राहणार आहे.









