वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतामध्ये पहिल्यांदाच तिरंदाजी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय तिरंदाजी संघटनेने सोमवारी केली. सदर पहिली तिरंदाजी लीग स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत भरविली जाणार आहे.
दिल्लीतील यमुना क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा 11 दिवस चालणार आहे. विश्व तिरंदाजी संघटना, आशियाई तिरंदाजी संघटना आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रोत्साहनामुळे सदर स्पर्धा पहिल्यांदाच भारतामध्ये भरविली जात आहे. भारतीय तिरंदाजांचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टिने ही योजना आखण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये जगातील अव्वल दहा तिरंदाज सहभागी होणार आहेत. या लीग तिरंदाजी स्पर्धेमध्ये सहा फ्रांचायझींचे संघ राहतील. या स्पर्धेमुळे भारतीय तिरंदाजपटूंना सराव मिळेल आणि त्याचा लाभ त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये होऊ शकेल, असे अखिल भारतीय तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन मुंडा यांनी सांगितले.









