वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताची महिला नेमबाज शीतल देवीने शुक्रवारी तिरंदाजी या क्रीडा प्रकारात दोन सुवर्णपदकांची कमाई करत नवा विक्रम केला. एका स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवणारी शीतल देवी ही पहिली भारतीय महिला पॅरा तिरंदाजपटू आहे. शीतल देवीने महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये हे यश प्राप्त केले. या स्पर्धेचा आता एक दिवस बाकी असून पदक तक्त्यामध्ये भारताने एकूण 94 पदकांची कमाई केली आहे.
दोन्ही हात नसलेल्या जम्मू काश्मीरच्या 16 वर्षीय महिला तिरंदाज शीतल देवीने पायाच्या मदतीने शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत तिने आतापर्यंत तीन पदकांची कमाई केली. चालू आठवड्याच्या प्रारंभी महिलांच्या मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात शीतल देवीने सुवर्णपदक मिळवले होते तर महिलांच्या दुहेरी प्रकारात तिने रौप्यपदक घेतले आहे. गेल्या जुलैमध्ये झालेल्या विश्व पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक मिळवणारी शीतल देवी ही भारताची पहिली हात नसलेली महिला तिरंदाजपटू आहे.
शुक्रवारी येथे झालेल्या महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात शीतल देवीने सिंगापूरच्या अलिम नूर सियादाचा 144-142 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत चालू आठवड्याच्या प्रारंभी भारताच्या अंकूर धामाने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. यानंतर असा पराक्रम करणारी शीतल देवी भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे. शुक्रवारी भारताच्या बॅडमिंटनपटूंनी 9 पदके मिळवली. विद्यमान पॅरा ऑलिम्पिक चॅम्पियन बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने बॅडमिंटनच्या एकेरीत एसएल 3 प्रकारात सुवर्णपदक मिळवताना भारताच्या नितेशकुमारचा 22-20, 21-19 असा पराभव केला. बॅडमिंटनच्या एसएल 4 प्रकारात भारताचा आयएएस अधिकारी सुहास यथिराजने सुवर्णपदक पटकावले. टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत यथिराजने रौप्यपदकाची कमाई केली होती. याच क्रीडा प्रकारात भारताच्या सुकांत कदमने कास्यपदक मिळवले. महिलांच्या एसयु 5 एकेरीच्या बॅडमिंटन प्रकारात भारताच्या टी. मुरुगेशनने चीनच्या यांगचा 21-19, 21-19 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. भारताच्या मनीषा रामदासने कास्यपदक घेतले. पुरुषांच्या एसएल 3-एसएलएफ 4 दुहेरीच्या प्रकारात भारताच्या नितेश आणि तरुण यांनी सुवर्णपदक मिळवले असून या क्रीडा प्रकारात प्रमोद भगत आणि सुकांत यांनी कास्यपदक पटकावले. पुरुषांच्या एसएच 6 बॅडमिंटन एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या कृष्णा नागरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हाँगकाँगच्या केईने कृष्णा नागरचा 21-10, 8-21, 21-11 असा पराभव केला.
अॅथलेटिक्स या प्रकारामध्ये पुरुषांच्या 1500 मी. टी-38 धावण्याच्या शर्यतीत भारताच्या रमन शर्माने 4 मिनिटे 20.80 सेकंदाचा अवधी घेत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. पुरुषांच्या एफ 54 भालाफेक प्रकारात भारताच्या प्रदीपुकमारने 25.94 मी.चे अंतर नोंदवत रौप्यपदक तर लक्षितने 21.20 मी. चे अंतर नोंदवत कास्यपदक मिळवले. महिलांच्या एफ 37.38 थाळीफेक प्रकारात भारताच्या लक्ष्मीने 22.55 मी. चे अंतर नोंदवत कास्यपदक घेतले. त्याचप्रमाणे भारताचे तिरंदाजपटू राकेशकुमारने पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात रौप्यपदक मिळवले.









