वृत्तसंस्था / हर्मोसिलो (मेक्सिको)
भारताच्या धीरज बोम्मदेवराने दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये सांघिक गटात सुवर्णपदक विजेत्या राहिलेल्या किम वूजिनला 6-2 असा धक्का दिला असला, तरी पुढील दोन लढती हरल्याने त्याच्यावर रिक्त हस्ते परतण्याची पाळी आली आहे. यामुळे तिरंदाजी विश्वचषकातील भारताची कमाई एकमेव रौप्यपदकापुरती राहिली आहे.
मोसमाची अखेर करणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी भारताने आजवरचे सर्वांत मोठे पाच तिरंदाजांचे पथक उतरवूनही कंपाउंड गटातील तिरंदाज प्रथमेश जावकरने मिळवून दिलेले एकमेव रौप्यपदक वगळता हाताला आणखी यश लागले नाही. रिकर्व्ह गटातील उदयोन्मुख भारतीय तिरंदाज धीरजने आपल्या मोहिमेची जोरदार पद्धतीने सुऊवात करताना 0-2 असे पिछाडीवर पडल्यानंतरही उसळी घेताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोरियन खेळाडूला उपांत्यपूर्व फेरीत 28-29, 30-28, 30-28, 29-26 असे चकीत केले.
परंतु लष्कराच्या या 22 वर्षीय तिरंदाजाला कोरियाचा आणखी एक तिरंदाज ली वू सीओकविऊद्धच्या उपांत्य फेरीतील लढतीत 1-7 (28-28, 27-30, 28-30, 28-29) असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठीच्या प्लेऑफ लढतीत मेडेलिन विश्वचषक विजेता मौरो नेस्पोलीशी त्याची गांठ पडली. कांस्यपदकासाठीची ही लढत इटालियन तिरंदाजाने शूट-ऑफमध्ये 6-5 (29-30, 27-27, 25-29, 27-26, 27-28) (10-9) अशी जिंकली.
भारताचा जयंत तालुकदार हा रिकर्व्ह गटातील एकमेव असा पुऊष तिरंदाज आहे ज्याने 13 वर्षांपूर्वी एडिनबर्ग येथे झालेल्या विश्वचषक अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले होते. त्याचप्रमाणे डोला बॅनर्जी ही एकमेव अशी भारतीय तिरंदाज आहे जिने विश्वचषक अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकून दाखविले होते. 2007 मध्ये दुबईमध्ये झालेल्या स्पर्धेत महिलांच्या रिकर्व्ह विभागात तिने हे सुवर्णपदक मिळवले होते. पदकांच्या बाबतीत रिकर्व्ह गटातील महिला तिरंदाज दीपिका कुमारी ही सर्वांत यशस्वी भारतीय राहिलेली असून तिने वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम फेऱ्यांत चार रौप्यपदके जिंकलेली आहेत.









