वृत्तसंस्था/ बँकॉक
2024 साली होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिरंदाजी या क्रीडा प्रकारातील कोटा पद्धतीनुसार तिरंदाजपटूंची पात्रता ठरविली जाते. दरम्यान येथे सुरू असलेल्या आशियाई खंडीय पात्र फेरीच्या तिरंदाजी स्पर्धेत शनिवारी भारताचा तिरंदाजपटू धीरज बोमादेवराने रौप्यपदक पटकाविले. या कामगिरीमुळे त्याने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट आरक्षित केले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा पद्धतीतून पात्र ठरणारा धीरज बोमादेवरा हा पहिला भारतीय तिरंदाजपटू आहे. बँकॉकमध्ये सुरू असलेल्या या पात्र फेरीच्या तिरंदाजी स्पर्धेत पुरूष आणि महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात चीन तैपेई आणि भारत या दोन देशातील तिरंदाजपटूंमध्ये पदकासाठीची चूरस सुरू झाली आहे. दरम्यान पुरूषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारातील सुवर्णपदकाच्या लढतीत चीन तैपेईच्या लिनने धीरजचा 6-5 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. लिन आणि धीरज हे दोन्ही तिरंदाजपटू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पात्र फेरीच्या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत धीरजने इराणच्या सादिक बेविलचा 6-0 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला होता. मात्र या पात्र फेरीच्या स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात भारताच्या एकाही महिला तिरंदाजपटूला उपांत्यफेरी गाठता आली नाही.









