बसच्या मागे शिडीवर राहून प्रवाशांचा प्रवास : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
म्हापसा : खासगी प्रवासी बसेस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जीवघेणी वाहतूक सध्या करीत असून त्याचा प्रत्यय आज धुळेर म्हापसा येथे पाहायला मिळाला. ही बस पूर्ण भरल्यामुळे बसच्या मागील शिडीला धऊन काही प्रवासी प्रवास करत होते. हा प्रवास जीवघेणा असून हात निसटून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असून त्यांचा खासगी बसचालकांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे संतप्त प्रवाशांनी सांगितले. म्हापसा बसस्थानकावर खासगी बसधारकांचा मनमानी कारभार चालला आहे. कळंगूट, कांदोळी, डिचोली, कामुर्ली, शिवोली आदी ठिकाणी जाणाऱ्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी घेऊन जाण्याचा प्रकार अनेकदा पाहायला मिळते. अनेकवेळा वाहक व चालक गणवेष न घालता बसेस हाकतात. तसेच कांदोळी, कळंगूट, हडफडे भागात जाणाऱ्या बसेस अनेकदा कंडक्टर चालवतात, असे काही प्रवाशांनी सांगितले. या सगळ्dयाकडे म्हापसा वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असून अधिकारी कार्यालयात बसण्यातच समाधान मानत आहेत. तर वाहतूक पोलीस केवळ दुचाकीचालकांना दंड देण्यातच मग्न असतात.









