लाईनमनची बदली केल्याने नागरिकांतून तीव्र संताप
बेळगाव : हिंडलगा हेस्कॉम कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. मनमानी पद्धतीने कोणतीही पूर्वकल्पना न देताच वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच लाईनमनची बदली करण्यात आल्याने नव्या लाईनमनची त्या ठिकाणी नियुक्ती केली आहे. पण नवीन लाईनमनला कामाचा अनुभव नसल्याने वारंवार विविध ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. कोणत्या ठिकाणी फॉल्ट आहे ते समजणे नवीन लाईनमनला कठीण जात असल्याने पुन्हा जुन्या लाईनमनची तेथे नियुक्ती करावी, अन्यथा हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सावगाव, बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी दिला आहे.
हिंडलगा हेस्कॉम कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या बेनकनहळ्ळी आणि सावगाव गावांसाठी गेल्या काही वर्षांपासून मल्लेशी इराप्पा मेटगुडली हा लाईनमन सेवा देत होता. रात्री-अपरात्री एखादी घटना घडल्यास संबंधित लाईनमन आपल्या सहकाऱ्यांसह सदर ठिकाणी धाव घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याची हिंडलगा येथे बदली करण्यात आली असून त्याच्या ठिकाणी हिंडलगा येथील शुभम पाटील या लाईनमनची नियुक्ती करण्यात आली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात शिकाऊ व नवख्या लाईनमनला या परिसरात नियुक्ती करण्यात आल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. कोणत्या ठिकाणी फॉल्ट आहे, हे त्याला समजणे कठीण जात आहे. त्यामुळे याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
समस्या समजत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी
सध्या शेतकरीवर्ग भातपिकाला पाणी देण्यासाठी विहिरी व कूपनलिकांवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना थ्री फेज वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. पण वारा-पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडत आहेत. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. जुन्या लाईनमनला या भागातील समस्यांची जाणीव होती. त्यामुळे एखाद्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यास कोठे समस्या निर्माण झाली आहे, त्याची त्याला माहिती अगदी सहजरीत्या मिळत होती. मात्र, हिंडलगा हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने लाईनमनची बदली करून नवख्या व शिकाऊ लाईनमनची नियुक्ती केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तातडीने जुन्या लाईनमनची नियुक्ती न झाल्यास हिंडलगा हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.









