सैन्य दलात सेवा बजावणाऱ्यांकडून जबरदस्तीने टोलवसुली
खानापूर : खानापूर-बेळगाव महामार्गावरील गणेबैल येथील टोलनाक्यावर टोल कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. याचा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. ज्यांना टोलमधून सवलत आहे. अशानाही टोलसाठी अडवून टोल भरल्याशिवाय गाडी सोडण्यात येत नसल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने अनेकवेळा या ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. या मनमानी कारभारामुळे अनेकांना नाहक त्रास तसेच वेळ वाया जात आहे. यासाठी रस्ते महामार्ग प्राधिकरणाने येथील कर्मचाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. सैन्य दलात सेवा बजावत असलेल्यांना किंवा निवृत्त झालेल्यांना टोलनाक्यातून सवलत आहे. मात्र गणेबैल टोलनाक्यावर वेळोवेळी सैन्य दलात सेवेत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या जवानांना कर्मचाऱ्यांनी अडवून त्यांच्याशी हुज्जत घालून टोल वसुलीसाठी त्यांचा अपमान करण्यात येत असल्याच्या घटना वेळोवेळी घडत आहेत. त्यामुळे सैन्य दलात सेवा बजावणाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात सैन्य दलातील सर्वांनीच आक्षेप नोंदवलेला आहे. सोमवारी खानापुरातील रहिवासी असलेले मायकल काडतोस हे वायूदलात सेवा बजावत आहेत. ते ख्रिसमससाठी सुटीवर आले असता आपल्या वाहनातून बेळगावला जाताना त्यांना अडवून टोलसाठी त्यांच्याबरोबर हुज्जत घालण्यात आली. यावेळी त्यांनी आपले ओळखपत्र दाखवल्यानंतरही त्यांच्याकडून टोल आकारण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
खानापूर, गणेबैल टोलनाक्याचा कायमच मनमानी कारभार सुरू आहे. वेळोवेळी अनेकांशी या ठिकाणी हुज्जत घालण्यात येते. त्यामुळे इतर वाहनधारकांना अर्धा अर्धा तास ताटकळत राहावे लागत आहे. तर ज्यांचा फास्टॅग आहे. त्यांच्यातून दोन्हीवेळा तीस-तीस रुपये वसूल करण्यात येत आहेत. याबाबत वेळोवेळी आवाज उठवून देखील महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीच सूचना अथवा व कारवाई केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तालुक्यात सैन्यदलात सेवा बजावणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांना टोलवसुलीतून सवलत देण्याचा निर्णय असतानादेखील त्यांच्याकडून टोलवसुलीसाठी अट्टाहास का करण्यात येतो, असा सवालही उपस्थित होत आहे. तसेच परिसरातील नागरिकांना मासिक पासची सोयही योग्य पद्धतीने देण्यात येत नसल्याने अनेकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून सेवा बजावत असलेले व्यवस्थापकाच्या वर्तणुकीमुळे कायमच वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. यासाठी महामार्ग प्राधिकरणाने याबाबत तातडीने योग्य तो क्रम घ्यावा, अशी मागणी होत आहे.









