वेगावर ताबा ठेवा : अन्यथा तुरमुरीजवळ गाड्या अडवण्याचा इशारा
वार्ताहर/उचगाव
तुरमुरी कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यासाठी बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरून ये-जा करणाऱ्या बेळगाव महानगरपालिकेच्या वाहनचालकांची वाहने चालविताना मनमानी चालली आहे. त्यांनी वाहनांच्या वेगावर ताबा ठेवावा आणि वाहने सुरळीत चालवावी. अन्यथा तुरमुरी गावाजवळ या गाड्यांना अडविण्यात येतील, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे. शनिवार दि. 21 सप्टेंबर रोजी एक वृद्ध दुचाकीवरून जाताना या कचरावाहू वाहनाने मागून धडक दिली. मात्र नशीब बलवत्तर म्हणून त्याला इजा झाली नाही. असे प्रकार सातत्याने घडत असतात यावर मनापाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर वाहनचालकांना समज देणे गरजेचे आहे. अनेक वेळा या मार्गावर या वाहनाकडून अपघाती झालेले आहेत. सध्या पुन्हा एकदा सदर वाहन चालक बेजबाबदारपणे वाहने चालवत असल्याचे निदर्शनाला आले असून, या मार्गावरील प्रवाशांतून तक्रारी वाढल्या आहेत. अन्य वाहनांना बाजू न देणे, वेगाने वाहने पळविणे, विनाकारण हॉर्न वाजविणे असे प्रकार सर्रास घडत असल्याचे दिसून येत आहे.
वाहनचालक मद्याच्या नशेत
बहुतांश चालक दारुच्या नशेत वाहन चालवत असल्याचेही आढळून आले आहे. बेळगाव बाची मार्गावरील दारुच्या दुकानासमोर वाहने थांबवून दारू ढोसत असल्याचेही अनेकांकडून सांगण्यात येते. यासाठी संबंधित खात्याने तातडीने त्यांना समज द्यावी, अन्यथा या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशाकडूनच या वाहन चालकांची दखल घेतली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
या कचरावाहू गाड्यामध्ये कचरा अधिक भरल्यामुळे तसेच त्यावर झाकण्यात आलेल्या ताडपत्री व्यवस्थित न बांधल्याने अनेक वेळेला कचरा रस्त्यावर पडल्याचे चित्रही दिसून येते. त्याचा त्रास मात्र प्रवाशांना होतो. याचीही खबरदारी घेणे गरजेचे आहे.









