सर्व सेवा कोलमडण्याची शक्यता : 40 कर्मचाऱ्यांना सफाई कामगार म्हणून परतण्याचे आदेश दिल्याने नाराजी : रुजू झाल्यापासूनच वादग्रस्त निर्णय
खानापूर : काही महिन्यापूर्वी रुजू झालेले खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत. पुन्हा नव्याने वादग्रस्त निर्णय घेत नगरपंचायतीत घरपट्टी वसुली, पाणीपट्टी वसुली व इतर विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सफाई कर्मचारी म्हणून कामावर परतण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीची घरपट्टी वसुली तसेच पाणीपुरवठा, व्यवस्थापकीय सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. एकूण 40 कर्मचाऱ्यांना सफाई कामगार म्हणून रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत लक्ष्मण मादार, रफिक वारीमणी, प्रकाश बैलूरकर यांनी मुख्याधिकारी राजू वठार यांना धारेवर धरुन जाब विचारला आहे. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी आपले आडमुठे धोरण कायम ठेवल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नगरपंचायतीत गेल्या काहीवर्षापासून कंत्राट पद्धतीवर कर्मचारी घेण्यात येत आहेत. काही विभागात रोजंदारी कामगार घेण्यात येत आहेत. अशा पद्धतीने एकूण 55 कर्मचारी नगरपंचायतीत कार्यरत आहेत. या सर्वाना कंत्राट व रोजंदारी पद्धतीने कामावर घेताना सफाई कामगार व पाणीपुरवठा विभागात कर्मचारी म्हणून नेमणूक केली आहे. मात्र यातील काही कर्मचारी नगरपंचायतीच्या कार्यालयात कार्यरत आहेत. पाणीपट्टी, घरपट्टी, पाणीपुरवठा यासह इतर विभागात ते कार्यरत आहेत. गेल्या चार दिवसापूर्वी या सर्व कर्मचाऱ्यांना सफाई कामगार म्हणून रुजू व्हावे, असे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या सर्वच सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
मुख्याधिकारी आडमुठे भूमिकेवर ठाम
गेल्या 20 वर्षापासून हे कर्मचारी विविध विभागात कार्यरत आहेत. जर हे सर्वच कर्मचारी सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाल्यास या विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा होणार आहे. त्यामुळे सर्वच कामे ठप्प होणार आहेत. याची कल्पना नगरसेवकानी मुख्याधिकाऱ्यांना देऊनदेखील मुख्याधिकारी आपल्या आडमुठे भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरवासियांची कामे ठप्प झाली आहेत. याबाबत नगरसेवक लक्ष्मण मादार, प्रकाश बैलूरकर, रफिक वारीमणी यांनी बुधवारी नगरपंचायतीला भेट देवून मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. तसेच नगरपंचायतीच्या कामकाजाची वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे सांगितले आहे. याबाबत लक्ष्मण मादार यांनी विचारले असता, सध्या नगरपंचायतीवर प्रशासक असल्याने आमच्यावर काही निर्बंध आहेत. येत्या काही दिवसात अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुका झाल्यानंतर आणि प्रशासक हटवल्यानंतर आम्ही याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे ते म्हणाले. नगरपंचायत विभागाच्या प्रशासकीय व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार मी हे आदेश बजावले आहेत. त्यामुळे माझा यात काहीही हेतू नाही. असेही ते ‘तरुण भारत’शी बोलाना म्हणाले.
चारचाकी वाहनाबाबतही संभ्रम
मुख्याधिकारी वठार खानापुरात रुजू झाल्यापासून ते चारचाकी वाहन वापरत आहेत. याबद्दलही संशय निर्माण झाली आहे. या चारचाकीचा खर्च नगरपंचायतीतून वेगळ्या पद्धतीने टाकण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. खानापूर नगरपंचायतीत आजपर्यंत मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी भाडोत्री चारचाकी वापरलेले नाही. त्यामुळे नागरिक तसेच नगरसेवकांतूनही याबाबत प्रश्न विचारला जात आहे.
मुख्याधिकाऱ्यांची तातडीने बदली करा
नगरपंचायतीकडे तक्रार करूनही कोणतीच सुधारणा झालेली नाही. उतारे, घरपट्टी, पाणीपट्टी, नाव दाखल यासह इतर कामांसाठी मुख्याधिकाऱ्यांकडून जनतेची अडवणूक होत आहे. यामुळे मुख्याधिकाऱ्याविरोधात शहरवासीयाकडून अनेकवेळा तक्रारी झाल्या आहोत. मुख्याधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यात यावी, यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रयत्न करावेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
वादग्रस्त निर्णयामुळे नगरसेवक -मुख्याधिकाऱ्यात खटके
वठार हे गेल्या चार महिन्यापूर्वी मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. सुरवातीपासूनच अनेक वादग्रस्त निर्णय घेतल्याने नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यात कायमच खटके उडत राहिले. मात्र याचा परिणाम खानापूर शहराच्या विकासावर झाला असून शहराची पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तसेच शहरातील कचरा उचलही योग्य पद्धतीने होत नाही. घंटा गाडी, कचरा वाहू, ट्रॅक्टर असूनदेखील शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडले आहे. याबाबत शहरवासियांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









