-देवरूख-साखरपा मार्गावरील वांझोळे येथील घटना
प्रतिनिधी/ देवरुख
देवरूख-साखरपा मार्गावरील वांझोळे येथे सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास खासगी आराम बस उलटून झालेल्या भीषण अपघातात 1 वृध्द ठार तर 27 प्रवासी जखमी झाले. जखमींवर जिल्हा रूग्णालय व खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणी आराम बस चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण काशिनाथ येजरकर असे अपघातात मृत झालेल्या वृध्दाचे नाव आहे. तर गौरव विठ्ठल नार्वेकर, विजय यशवंत गुरव, जयश्री विजय गुरव, सुमन सुनील करंगुटकर, सुनील शांताराम करंगुटकर, प्रदीप लक्ष्मण नार्वेकर, शर्मिला संदीप मोंडे, रूपाली रूपेश बारी, प्रणाली गिरीधर वाडेकर, सानिका नितीन गुरव, रिया अनिल करंजे, विनायक लक्ष्मण नार्वेकर, अनिल पुंडलिक करंजे, आशिष प्रवीण दसुरे, ऋषिकेश प्रवीण दसुरे, राजेश चंद्रकांत पावसकर, सागर सरदार जाधव, आकाश विजय गुरव, नितीन रमेश जाधव, विकास जयवंत यादव, अक्षता विजय गुरव, दीपमाला येजरकर, अमर अनंत पवार, रोशन रमेश कायंदेकर, तुळसीदास केशा वाघे, यज्ञेश दीपक जाधव हे प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
विकास यादव हा आपल्या ताब्यातील ‘विमलेश्वर’ ही खासगी आराम बस घेवून देवगडहून विरारच्या दिशेने निघाला होता. यादव याचे वांझोळे येथे आल्यावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या महेंद्रा पिकअप् वाहनाला धडक दिली. या वाहनाचे नुकसान होण्याबरोबर चालक व क्लीनर जखमी झाला. ठोकर दिल्यानंतर पुढे येवून बस थेट उलटली. बस वेगात असल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसमधील 27 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी बसमध्ये अडकले होते. मदतीसाठी सर्वजण आकांत करत होते. या अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
यावेळी देवरूख, साखरपा, लांजा आदी ठिकाणाहून रूग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले. काही जखमींना प्रथम देवरूख ग्रामीण रूग्णालय तर काहींना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. देवरूख ग्रामीण रूग्णालयात देवरूखमधील डॉक्टरांची टीम उपचारासाठी सज्ज होती. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जखमींना रूग्णालयात ने-आण करण्यासाठी हातभार लावला. अपघातातील लक्ष्मण काशिनाथ येजरकर यांच्यावर रत्नागिरी येथे उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
अपघातास वाहनाच्या नुकसानीसह तसेच प्रवाशांच्या मृत्यूस व जखमीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालक विकास यादव यांच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम 304 अ, 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









