शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांचे विधानपरिषदेत उत्तर
बेळगाव : राज्यातील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सेवा बजावत असलेल्या अतिथी शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करण्याविषयी अर्थ खात्याची मंजुरी मिळविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी दिली. विधानपरिषदेत भाजपचे सदस्य डॉ. धनंजय सर्जी यांनी विचारलेल्या प्रश्नावर मधू बंगारप्पा यांनी उत्तर दिले. राज्यातील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक रिक्त असणाऱ्या जागांवर यंदा शैक्षणिक वर्षअखेरपर्यंत अतिथी शिक्षकांची नेमणूक केली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही व्यवस्था केली आहे. प्राथमिक शालेय अतिथी शिक्षकांच्या मानधनात 15 हजार रुपये आणि माध्यमिक शोलय अतिथी शिक्षकांच्या मानधनात 16 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी अर्थखात्याकडे प्रस्ताव पाठविला होता. सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अतिथी शिक्षकांच्या मानधन वाढीसाठी पुन्हा एकदा अर्थखात्याकडे प्रस्ताव सादर केला जाईल. अतिथी शिक्षक/प्राध्यापकांऐवजी अर्धवेळ शिक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव शिक्षण खात्यापुढे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.









