ठाणेसह म्हाऊस पंचायतीकडून स्वागत, केंद्राची परवानगी मिळाल्यावर बांधकामास प्रारंभ
उदय सावंत/वाळपई
सत्तरी तालुक्यातील ठाणे पंचायत क्षेत्रातील चरावणे येथे 2006 साली सुरू झालेले धरणाचे काम बिगर सरकारी संस्थांच्या विरोधामुळे बंद पडले. गेल्या 17 वर्षापासून सदर धरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. शेवटी 17 वर्षानंतर गोवा सरकारच्या वन्यजीव महामंडळाने याला मान्यता दिली आहे. आता केंद्राची परवानगी मिळाल्यानंतर धरण उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे या भागातील नागरिक व पंचायतीने स्वागत केले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली आहे.
या धरण प्रकल्पामुळे ठाणे पंचायत क्षेत्रातील अनेक गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सध्यातरी ठाणे पंचायत क्षेत्रातील चरावणे, हिवरे, पाली, ठाणे, गोळावली आदी भागांमध्ये पिण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. दाबोस पाणी प्रकल्पाचे पाणी या भागांमध्ये अपेक्षित प्रमाणात पोहोचत नाही. यामुळे टँकरद्वारे या भागाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अनेकवेळा हा पाणीपुरवठा कमी पडत असल्यामुळे त्याचे विपीतर परिणाम होत असतात.
जैविक संपत्ती होणार संवर्धित
एकूण प्राप्त माहितीनुसार या प्रकल्पाला 2005 प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती. 2006 या प्रकल्पाची पायाभरणी केली. सुमारे एक वर्ष या प्रकल्पाचे काम सुरू होते. जवळपास 20 टक्के या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर काही बिगर सरकारी संस्थांनी या संदर्भात विरोध केल्यामुळे या प्रकल्पाचे काम अर्धवट बंद करावे लागले. या प्रकल्पाच्या माध्यमातून डोंगराळ भागातील पाण्याचा साठा एकत्र झाल्यास जैविक संपत्ती संवर्धित होण्यास मदत होईल.
सरकारच्या वन्यजीव महामंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीमध्ये या प्रकल्पाला प्राथमिक स्तरावर मान्यता दिलेली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवायची असेल तर धरण प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. या संदर्भात जलसिंचन खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांनी व्यवस्थितपणे मांडणी केल्यानंतर या प्रकल्पाच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
विविध पंचायतीकडून स्वागत : सरपंच सरिता गावकर
या प्रकल्पाची उत्कंठा गेल्या अनेक वर्षापासून होती. ती आता पूर्णत्वास येणार आहे. जवळपास 17 वर्षानंतर या प्रकल्पाबाबत असलेल्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत होण्यास सुऊवात झालेली आहे. हा प्रकल्प भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यास महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाचा फायदा ठाणे पंचायत क्षेत्रासह म्हाऊस पंचायत क्षेत्रातील अनेक गावांना होणार असल्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे पंचायतीच्यावतीने सरपंच सरिता गावकर यांनी स्वागत केले आहे.
हा प्रकल्प होणे अत्यंत महत्त्वाचे : सोमनाथ काळे
या प्रकल्पाचा म्हाऊस पंचायत क्षेत्रातील कोपर्डे गावाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यास त्याचे दुरान्वये संबंध अनेक गावांना होणार आहेत. नदी नाले बारामाही वाहणार आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे, असे सरपंच सोमनाथ काळे यांनी सांगितले.









