रेल्वेगेटवरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याने भुयारी पुलाबाबत शंका
खानापूर : खानापूर-असोगा रस्त्यावरील रेल्वेमार्गावरील भुयारी पुलाचे काम होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असोगा रस्त्यावरील रेल्वेगेटच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच रेल्वेस्टेशनचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र भुयारी मार्गाच्या कामाची काहीच हालचाल होत नसल्याने आता भुयारी मार्ग होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
खानापूर-असोगा रस्त्यावरील रेल्वे रुळावर फाटक आहे. या फाटकामुळे 1 कि. मी. फेरा मारुन असोगा रस्ता गाठावा लागतो. यासाठी खानापूर व असोगा येथील अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा, यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत मागणी केली होती. याबाबत तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी, कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी खानापूर येथे प्रत्यक्ष पाहणी करून भुयारी मार्ग करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने याबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचबरोबर रेल्वेफाटक विकासाचे कामही वेगाने सुरू होते. रेल्वेफाटकाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून असोग्याच्या बाजूने काँक्रीटीकरण करून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भुयारी मार्ग होणार की नाही, अशी शंका व्यक्त होत आहे.
लोंढा-मिरज या रेल्वेरुळाचे दुपदरीकरणाचे काम तसेच विद्युतीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या दृष्टीने खानापूर रेल्वेस्थानकाचे काम अद्ययावत पद्धतीने करण्यात आले आहे. तसेच दोन्ही बाजूला प्लॅटफार्म तयार करण्यात आल्याने दोन्ही बाजूला ये-जा करण्यासाठी रस्ता निर्माण करण्यात आला आहे. तसेच रेल्वेस्थानकाच्या बाहेर विद्युतीकरणाचे मोठे पॉवरस्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. या पॉवरस्टेशनमधून बेळगाव ते लोंढा या मार्गावर विद्युतपुरवठा करण्यात येणार आहे. या पॉवर स्टेशनला खानापूर, डुक्करवाडी येथील विद्युत केंद्रातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.येथील काही कार्यकर्त्यांनी याबाबत वरिष्ठ पातळीपर्यंत मागणी लावून धरली होती. रेल्वेच्या तांत्रिक विभागाने याबाबत अहवाल देण्यास टाळाटाळ केली होती.
याबाबत अद्याप रेल्वेच्या तांत्रिक विभागाने कोणतीच मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे रेल्वेफाटकावर भुयारी मार्ग होईल की नाही, याबाबत काही स्पष्ट झालेले नाही. जर तांत्रिक विभागाने मंजुरी दिली नसल्यास हा भुयारी मार्ग होणार नाही. यासाठी खानापूर येथील नागरिकांनी पुन्हा वरिष्ठ पातळीपर्यंत मागणी करणे गरजेचे आहे.









