मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा कंदील. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांची माहिती. विद्यमान फेरीसेवेतील समस्येवर तोडगा. आवश्यक मनुष्यबळाची लवकरच तरतूद.
रविराज च्यारी. डिचोली
गोव राज्यातील सर्वात महत्वाचा जलमार्ग म्हणून ओळखला जाणाऱया चोडण माडेल ते रायबंदर या जलमार्गावर लवकरच रो – रो फेरीसेवा प्रकल्प हाती घेण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्वता मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक फेरीधक्का आणि इतर साधनसुविधा तयार करणे. व रो – रो फेरीबोटी सरकारच्या ताफ्यात येणार तेव्हा हा प्रकल्प मार्गी लागणार, अशी माहिती मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
या जलमार्गावर रो – रो फेरीसेवेबरोबरच सध्या सुरू असलेल्या फेरीसेवेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याबरोबर एक महत्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत चोडण ते रायबंदर या जलमार्गावरील समस्यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यात सध्या फेरीबोटींवर काम करणाऱया कर्मचाऱयांची कमतरता असल्याने जर एखाद्या दिवशी कर्मचारी रजेवर गेले, किंवा अचानकपणे त्यांना काही कारणास्तव कामावर येता आले नाही तर अपुऱया कर्मचाऱयांमुळे थेट फेरीसेवाच बंद ठेवावी लागते. असे आढळून आले.
नवीन कंत्राटी कामगार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
यावर उपाय काढताना सर्वप्रथम कंत्राटी पध्दतीने फेरीबोटीवर काम करण्यासाठी कुशल अशा कामगारांची भरती तातडीने करावी व अपुऱया कर्मचारीबळामुळे फेरीसेवा बंद राहू नये याची काळजी घेण्यात यावी, या मागणीवर आमदार प्रेमेंद्र शेट यांनी जोर लावला. त्याच नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी लगेच मंजुरी देत कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरतीसाठी प्रक्रियाही सुरू केली. सध्या हि प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कर्मचारी भरतीही होणार आहेत. त्यामुळे आता अपुऱया कर्मचारी बळामुळे फेरीबोट बंद ठेवण्याची पाळी येणार नाही, असे आमदार शेट यांनी सांगितले.
चोडण ते रायबंदर जलमार्गावर धावणार नियमित पाच फेरीबोटी
आवश्यक संख्येने कर्मचारी भरती झाल्यानंतर चोडण ते रायबंदर या जलमार्गावर नियमित अविश्रांत पाच फेरीबोटी धावणार आहेत. असेही आमदार शेट यांनी सांगितले. या महत्वाच्या जलमार्गावर पाच फेरीबोटी कायम चालू ठेवाव्यात अशी या भागातील लोकांची, तसेच या मार्गावर नियमित ये जा करणाऱया वाहनचालकांची मागणी आहे. काही कारणास्तव एक सुध्दा फेरीबोट बंद राहिल्यास या मार्गावरील फेरीसेवेबरोबरच लोकांचेही वेळापत्रक कोलमडते. हिच समस्या आता अतिरिक्त कर्मचारी भरती झाल्यानंतर निकालात येणार आहे.
लवकरच धावणार रो – रो फेरीबोट, राज्याचे खास आकर्षण ठरणार
या अत्यंत व्यस्त अशा जलमार्गावर फेरीबोटीतून दिवसा हजारोंच्या संख्येने चारचाकी आणि दुचाकी ये जा करीत असतात. फेरीबोटींची संख्या जरी पाच असली तरी एका फेरीबोटीत एका वेळी चार किंवा पाच चारचाकी वाहने हाकून नेऊ शकतात. दिवसेंदिवस या जलमार्गावरील वाढणारा ताण आणि लोकांना जलद सेवा देण्याच्या इराद्याने लवकरच या मार्गावर रो – रो फेरीबोटी सुरू करण्याचा विचार सरकारचा आहे. नदी परिवहन मंत्री सुभाष शिरोडकर व मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्य त झालेल्या बैठकीत. आमदार शेट यां?नी सदर प्रस्ताव मंत्र्यांसमोर सादर केला होता. त्याला मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. या अनोख्या सेवेमुळे गोव्यातील जलमार्ग पर्यटनाला खास आकर्षण प्राप्त होणार आहे.
काय आहे ही रो – रो फेरीसेवा ?
गोव्यात अनेक ठिकाणी जलमार्गावर फेरीबोटी असल्याने फेरीसेवा हि संकल्पना काही नवीन नाही. त्यात रो रो फेरीसेवा म्हणजे गोवेकरांसाठी कुतूहलाचा विषय ठरणार. रो – रो फेरीबोट हि सामान्य फेरीबोटीसारखीच असते. परंतु ती लांब असते. रो रोला दोन्ही बाजूंनी फाळके असतात. ती वळवून फेरीधक्क्याला लावण्याची आवश्यकता नाही. एका बाजूने चारचाकी वाहन रो – रो फेरीत घातल्यावर ते वाहन दुसऱया बाजूने फेरीधक्क्यावर फेरीबोट लागताच थेट काढायला मिळते. त्यामुळे चारचाकी वाहने फेरीधक्क्यावर (रिव्हर्स गियरमध्ये) मागे पुढे करायची गरज नाही. आणि विशेष म्हणजे या रो रो फेरीत एकाचवेळी 20 ते 25 चारचाकी वाहने समावू शकतात. अशा दोन फेरीबोटी या जलमार्गावर सुरू झाल्यास वाहनांच्या मोठय़ा रांगा लागणार नाहीत. तसेच लोकांना तत्परतेने पैलतीर गाठण्यास मदत होईल. रांगांमध्ये राहून वेळ वाया जाणार नाही. हा प्रकल्प या जलमार्गावरील नियमित वाहनचालकांना वरदान ठरणार. सध्या अशा रो – रो देशातील काही राज्यांमध्ये सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून तत्वता मंजुरी, पुढील सोपस्कार लवकरच होणार
या रो – रो फेरीबोट सेवेचा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मांडला असता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यास लगेच तोंडी मान्यता दिली आहे. आता अधिकृतपणे या प्रकल्पासाठी लागणारे सर्व सरकारी सोपस्कार पूर्ण करण्याची प्रक्रिया गतीमानपणे हाती घेतली जाणार. या फेरीबोटींसाठी आवश्यक असलेले विशेष फेरीधक्के दोन्ही बाजूंनी साकारावे लागतील, आणि रो – रो फेरीबोटी उपलब्ध होताच हि सेवा लोकांच्या सेवेर्थ सुरू केली जाणार आहे, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
पुलाच्या कामाला प्राधान्य आहेच, पण तोपर्यंत लोकांनाही त्रास होऊ नये हि इच्छा

चोडण ते साल्वादोर द मुंद या पुलाच्या कामासाठी सरकारने युध्दपातळीवर जमीन संपादनाची प्रक्रिया हाती घेतली आहे. लवकरच सदर प्रक्रिया पूर्ण होऊन इतर सर्व आवश्यक सोपस्कार पूर्ण करणार व पुलाचे काम सुरू करणार. लोकांच्या मागणीनुसार हा पुल लवकर व्हावा अशी सरकारची आणि आपलीही इच्छा आहेच. परंतु तोपर्यंत लोकांना फेरीसेवेमुळे त्रास होऊ नये व वेळही वाया जाऊ नये यासाठी आपण विशेष प्रयत्न करीत आहे. फेरीबोट कर्मचारी भरती विषय तडीस लावल्यानंतर रो – रो फेरीसेवा चालीस लावण्याचा इरादा याच हेतूने समोर आणला आहे. लोकांना चांगली, सुरक्षित व जलद सेवा देण्यासाठी आपण तत्पर असल्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.









