मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती : तीन कैद्यांना स्वातंत्र्यदिनी करणार मुक्त
पणजी : राज्य मंत्रिमंडळाने कारवान पर्यटन धोरण तसेच होम स्टे, ब्रेड अँड ब्रेकफास्ट धोरणालाही मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गोवा पर्यटन खात्याने कारवान धोरण मान्य केले असून त्यासाठी सरकारने 9 कोटी बजेटला मान्यता दिली आहे. हे धोरण स्वीकारावे यासाठी अनेक विशेष प्रोत्साहन सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार प्रथम 50 वाहनांना अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच पर्यटन वाहन करातही पर्यटन खात्यातर्फे सूट देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. होम स्टे, ब्रेड अँड ब्रेकफास्ट धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. नोंदणी आणि होम स्टे कायदेशीर करण्यात आल्यामुळे या व्यवसायात चाललेला बेकायदेशीरपणा नियंत्रणात येणार आहे. तसेच या धोरणामुळे होम स्टे चा दर्जा वाढविण्यातही मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तीन कैद्यांना करणार मुक्त
मंत्रिमंडळाने घेतलेल्या अन्य एका निर्णयात, आझादी का अमृत महोत्सव निमित्त, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या तीन कैद्यांना त्यांच्या चांगल्या वर्तनासाठी 15 ऑगस्ट रोजी मुक्त करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
15 कोटींच्या बिलांना मंजुरी
आरोग्य खात्याच्या सुमारे 15 कोटी ऊपये खर्चाच्या बिलांना बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 5 कोटी तपस्या एंटरप्रायजेस तर 10 कोटी ऊपये वेलनेस फार्मसी यांना देण्यात आले आहेत.
फेरीबोटींसाठी तिसरी शिफ्ट
फेरीबोटींसाठी लवकरच तिसरी शिफ्ट सुरू करण्यात येणार आहे. सरकारने तसा निर्णय घेतला आहे. सध्या 9 मार्गांवर 30 फेरीबोटी चालतात. त्यातील 19 फेरीबोटीवर सध्याचे कर्मचारी तर उर्वरित 11 फेरीबोटीवर खाजगी किंवा गोवा रोजगार भरती सोसायटी अंतर्गत कर्मचारी भरती करण्यात येणार आहे.
बायपाससाठी जलस्रोतची जमीन
वेस्टर्न बायपाससाठी जलस्रोत खात्याची 2.20 लाख चौ. मी. जमीन संपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दवर्ली ते वेर्णा औद्योगिक वसाहतीपर्यंत कच्चे पाणी पुरविण्यास साधनसुविधा उभारण्यासाठी 2.60 लाख चौ. मी. जमीन घेण्यासही मंजुरी देण्यात आली. गोवा नॉन बायोडिग्रेडेबल गार्बेज कंट्रोल एक्ट आणि गोवा पब्लिक रिकॉर्ड बील यांनाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.









