बूस्टर डोस म्हणून वापरण्यास तज्ञ समितीची मंजुरी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने जगातील पहिल्या नस्य कोरोना लसीला मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिनचे उत्पादन करणाऱया हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे. नाकाद्वारे घेतली जाणारी ही लस बुस्टर डोस म्हणून घेता येणार आहे. देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता तातडीने खासगी रुग्णालयांमध्ये ती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
भारत बायोटेकच्या या नस्य लसीला ‘इनकोव्हॅक’ (iNCOVACC) असे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी याचे नाव बीबीव्ही154 असे होते. ही लस नाकाद्वारे शरीरात पोहोचवली जाणार आहे. या लसीमुळे कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण रोखण्यास मदत होणार आहे. या लसीकरणासाठी इंजेक्शनची गरज नसल्यामुळे दुखापत होण्याचा धोका नाही. तसेच आरोग्य कर्मचाऱयांना विशेष प्रशिक्षणाची गरज भासणार नाही. या लसीचा शुक्रवारपासूनच कोरोना लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 8 लसींना मान्यता देण्यात आली आहे. या सर्व इंट्रामस्क्मयुलर म्हणजेच इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱया लस आहेत. तर, ‘भारत बायोटेक’ची नस्य लस ही इंट्रानासल आहे. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डचे डोस घेणाऱयांना इंट्रानासल लस बूस्टर डोस म्हणून दिली जाईल. तथापि, ती प्राथमिक लस म्हणून देखील वापरली जाऊ शकते.









