सभापती तवडकरांसह प्रतिनिधी मंडळाकडून भेट
काणकोण : काणकोण मतदारसंघातील चार रस्ता ते काणकोण पोलीस स्थानकापर्यंत पथदीप बसविणे, अरूंद रस्त्याचे रूंदीकरण करणे यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंजुरी दिली असून काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांच्या ‘2030 सालचा समृद्ध काणकोण’ या संकल्पनेखाली या योजना राबविण्यात येणार आहेत. नुकतीच सभापती तवडकर यांच्यासहित काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, उपनगराध्यक्ष नारसिस्को फर्नांडिस, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, काणकोणच्या सेंत्रु प्रोमोतोर द इस्त्रुसांव या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शांबा देसाई यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन यासंबंधीचे निवेदन त्यांना सादर केले व चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, काणकोणच्या बांधकामाधीन रवींद्र भवन परिसराचे सौंदर्यीकरण करणे त्याचप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी पथदीप बसविणे याविषयी देखील या बैठकीत चर्चा करण्यात येऊन मुख्यमंत्र्यांनी या सर्व कामांना मंजुरी दिली.








