कोल्हापूर :
अंबाबाई मंदिर परिसराच्या 1445 कोटींच्या विकास आराखड्यास मंगळवारी मंजूरी मिळाली. याचबरोबर जोतिबा मंदिराच्या 259 कोटींच्या विकास आराखड्यासही यावेळी मंजूरी मिळाली आहे. आहिल्यानगर, चौंडी येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या विशेष बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे दोन्ही विकास आराखड्यांचा निधी मिळण्याचा आणि प्रत्यक्ष कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सेवासुविधा मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 1445 कोटींचा अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा केला. याचबरोबर जोतिबा मंदिराचा सुमारे 1600 कोटींचा विकास आराखडा करण्यात आला. हे दोन्ही आराखडे राज्य शासनाच्या मंजूरीसाठी पाठविले. मागील महिन्यांत मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्यासमोर याचे सादरीकरण झाले होते. मंगळवारी चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे झालेल्या विशेष मंत्री मंडळाच्या बैठकीत या दोन्ही आराखड्यास मंजूरी देण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर जिह्यातील श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर व श्री जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यांना अनुक्रमे 1445.97 कोटी व 259.59 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.
या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री व सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, कोल्हापूर जिह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर व रोहित तोंदले, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, उपअभियंता सुयश पाटील तसेच संबंधित कन्सल्टंट व आर्किटेक्ट संतोष रामाणे व अभिनंदन मगदूम उपस्थित होते.
- अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील कामे
–मंदिराचे दुरुस्ती व संवर्धन
–किरणोत्सव मार्गातील अडथळे व अतिक्रमणांचे निर्मूलन
–मंदिर परिसरातील दुकान गाळ्यांचे व्यवस्थापन
दर्शनासाठी अच्छादित मंडप
स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा
लॉकर्स, शू स्टँड
भवानी मंडप परिसराचा ‘हेरिटेज प्लाझा‘ म्हणून विकास करणे.
अंबाबाई मदिराचा एकूण परिसर – 7 एकर
भूसंपादनासाठी निधी – 980 कोटी 97 लाख
विकासकामांसाठी निधी – 465 कोटी 85 लाख
- 300 दुकाने, 170 मिळकतींचे भुसंपादन
मुख्य सचिव सुजाता सैनिक आणि सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी तीन टप्प्यामध्ये सुधारित आरखडा पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. यामध्ये पहिल्या टप्प्यात आवश्यक असणारेच भुसंपादन करावे, अशी त्यांची भूमिका होती. आता राज्यशासनाने एकाचवेळी 1445 कोटींचा निधीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे 300 दुकाने, 170 मिळकतींचे भुसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे.
- जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे
–श्री क्षेत्र जोतिबा व यमाई मंदिराचे संवर्धन
–पायवाटांचे जतन
–कर्पूरेश्वर, चव्हाण व मुरलीधर तलावांचे संवर्धन
–भाविकांसाठी वाहनतळ, सुविधा केंद्र
–अपारंपरिक ऊर्जा स्त्राsताद्वारे ज्योतस्तंभ निर्मिती
–घनकचरा व सांडपाणी प्रकल्प
–केदार विजय गार्डन व नवतळे परिसराचे सुशोभीकरण
–यमाई मंदिर चाफेवन परिसर विकास
- जोतिबा मंदिरासाठी 500 कोटी मिळणार
जोतिबा मंदिर परिसराचा 1600 कोटींचा विकास आराखडा आहे. त्यापैकी 259 कोटीतील पहिल्या टप्प्यातील कामांना मंगळवारी मंत्रीमंडळात मंजूरी मिळाली आहे. तसेच इतर विभागातूनही करण्यात येणाऱ्या कामांसाठी सुमारे 270 कोटींच्या निधींना मंजूरी यापूर्वीच मिळाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 500 कोटी मिळणार आहेत.
- सर्वांना विश्वासात घेवून अंमलबजावणी करू
अंबाबाई मंदिर विकास आराखडा, जोतिबा मंदिर विकास आराखड्यास मंजूरी मिळाली आहे. मंत्री मंडळाच्या झालेल्या निर्णयाचा अध्यादेश निघाल्यानंतर निधी मिळेल. सर्वांना विश्वासात घेवून आणि सर्वांच्या मदतीने तसेच शासनाच्या परवानगीनुसार यांची अंमलबजावणी केली जाईल.
अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर








