वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकधारक निरज चोप्राच्या विदेशातील प्रशिक्षणासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या एमओसीने अधिकृत मंजुरी दिली आहे. त्याच प्रमाणे भारतीय अॅथलेटिक्स क्षेत्रातील अन्य काही अॅथलेटिसनाही विदेशातील प्रशिक्षणासाठी हिरवा कंदिल दाखविण्यात आला आहे.
येथे झालेल्या मिशन ऑलिम्पिक सेल (एमओसी) च्या 157 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये विविध क्रीडापटूंना विदेशातील प्रशिक्षणाकरिता 86 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे टोकियोत 13 ते 21 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या भारतीय अॅथलीटसना याचा लाभ मिळेल.
भारताचा भालाफेकधारक निरज चोप्रा याला झेक प्रजासत्ताकमधील प्राग आणि निमबर्क येथे 57 दिवसांच्या कालावधीसाठी प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी त्याला 19 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे भारताचे धावपटू अविनाश साबळे, पारुल चौधरी आणि गुलवीर सिंग यांनाही 15 जुलै ते 3 सप्टेंबर दरम्यान लॉस एन्जिल्स येथे प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार असून या तीन खेळाडूंकरिता 41.29 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत









