राज्य सरकारकडून 10 कोटी 44 लाखांचा निधी
बेळगाव : बेळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने राज्य सरकारकडून शहरात आणखी एक अग्निशमन केंद्राला मंजुरी दिली आहे. या अग्निशमन केंद्रासाठी 10 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर केल्याने बेळगावमध्ये आणखी एक सुसज्ज असे अग्निशमन केंद्र नागरिकांच्या सेवेमध्ये येणार आहे. सध्या असलेले अग्निशमन केंद्र हे शहराच्या दक्षिण भागात आहे. तसेच बेळगाव शहरासह तालुक्याचाही बोजा याच अग्निशमन केंद्रावर असल्याने एकाचवेळी अनेक दुर्घटना घडल्यास मर्यादा येत होत्या.
त्यामुळे उत्तर भागात एखादे अग्निशमन केंद्र सुरू करावे, असा प्रस्ताव होता. 4 वर्षांपूर्वी अग्निशमन विभागाकडून महानगरपालिकेला पत्र पाठवून उत्तर भागात जागेची मागणी केली होती. त्यानंतर जुने पोलीस आयुक्त कार्यालयाच्या एका बाजूला तात्पुरत्या स्वरुपात शेड घालून जागा देण्यात आली. परंतु कर्मचाऱ्यांची व्यवस्था होत नसल्याने हे केंद्र पुन्हा बंद झाले. शहराचा विस्तार वाढल्याने दररोज आगीच्या घटना घडत आहेत. अग्निशमन वाहन शहराच्या इतर भागात पोहोचण्यामध्ये वाहतूक कोंडीची अडचण येत आहे. तीन मतदारसंघांसाठी केवळ एकच अग्निशमन केंद्र होते. त्यामुळे एखादे अतिरिक्त अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी होती. अखेर राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे सुसज्ज अग्निशमन विभाग लवकरच सुरू होणार आहे.









