वाजेकर रायकर कुटूंबाकडून ‘इनुल्लें’चा उत्सव साजरा
पौर्णिमा नागवेकर /राय
शेकडो कुटूंबाचा एकत्रित गणपती म्हणून ओळखण्यात येणाऱया वाजे- शिरोडा येथील ब्रह्म दैवज्ञ वाजेकर रायकर कुटूंबाने गुरुवारी पहाटे गणरायाच्या वाहनाला (उंदीराला) सूर्योदयापूर्वी प्रसाद दाखविला. या प्रक्रेयेला या कुटूंबात ‘इनुल्ले’ म्हणून संबोधले जाते.
मडगावातील या कुटूंबाचा एक सदस्य योगेश रामदास रायकर यानी सपत्नीक गुरुवारी पहाटे (1 सप्टेंबर 22) सूर्योदयापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली.
पूर्णाकृतीच्या आकाराचे सान्न ( इडली) तयार केले जाते व या सान्नाचे अंदाजाने तीन भाग केले जातात.रायकर वाडय़ाजवळ असलेल्या विहीरीकडे जाण्यासाठी पायऱयांची वाट आहे. याच पायऱयांच्या वाटेजवळ एक छोटीशी घुमटी उभारलेली आहे आणि त्या घुमटीजवळ गणरायाच्या या वाहकाला मान दिला जातो.
सान्नाच्या तीन तुकडय़ापैकी एक तुकडा या कुटूंबाचा प्रमुख म्हणून ओळखणाऱया पुरुषाकडे ( देवाकडे) ठेवण्यात येतो, दुसरा तुकडा या घुमटीजवळ ठेवला जातो व तिसरा तुकडा कुटूंबातील इतरांना प्रसाद म्हणून वाटण्यात येतो.
पोर्तुगीज काळापूर्वीपासून या कुटूंबाचा गणपती वाजे -शिरोडा येथे साजरा केला जातो आणि त्या वेळपासून ‘इनुल्ल्याचा मान देण्याची प्रथा सुरु असल्याची माहिती या कुटूंबाचे एक ज्येष्ठ सदस्य रमाकांत रायु रायकर यांनी ‘तरुण भारत’ला दिली.









