उचगाव,प्रतिनिधी
Kolhapur GaneshMurti Visarjan : आकर्षक लाईट, रशियन डीजे ऑपरेटरची धमाल, दोन बेस, दोन टॉप चा दणदणाट अशा उत्साही वातावरणात उचगाव ता.करवीर येथे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक रात्री दहाच्या ठोक्याला बंद करण्यात आली. काही मंडळे विसर्जन मिरवणुकीत नुकतीच आली होती.दहा वाजता वाजप बंद केल्याने मंडळाकडून नाराजी व्यक्त झाली.मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी मिरवणुकीला कमी कालावधी मिळूनही मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उचगावातील सार्वजनिक मंडळांचे त्याचबरोबर उचगाव ग्रामपंचायत व गांधीनगर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.मिरवणुकीकडे कोल्हापूरसह सर्व पंचक्रोशीचे लक्ष होते.
गांधीनगर पोलीस व उचगाव ग्रामपंचायत यांच्यामुळे उचगावमध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ड्रॉ पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या खंबीर भूमिकेमुळे मिरवणूक दहा वाजता बंद झाली.अनेक मंडळे तर विसर्जन मिरवणूक मार्गावरच होती तर काही उचगाव कमानीतून नुकतीच आत आले होते.काही कार्यकर्ते नाराज होऊन मंगेश्वर मंदिर चौकात ठिय्या मांडून बसले.पोलिसांनी त्यांची समजूत काढली.दोन तास वेळ वाढवून देण्याची विनंती केली.अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई,तसेच शहर डी.वाय.एस.पी,अजित टिके,करवीर डी .वाय.एस.पी संकेत गोसावी,पोलिस निरीक्षक तानाजी सावंत,एलसीबी प्रमुख महादेव वाघमोडे यांनी कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. लाखोंची सिस्टीम मात्र मुख्य मिरवणुकीच्या मार्गावर सुद्धा काही मंडळांना येता आले नाही. तरीही सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचे पोलिसांसह परिसरातून कौतुक होत आहे.
उचगाव ता. करवीर येथे घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन एका दिवशी होणे हे पारंपारिक वैशिष्ट्य आहे.गणेश उत्सवानिमित्त एकूण उचगावमध्ये सुमारे ६० गणेश मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली.त्यामुळे कोल्हापूर-हूपरी रस्त्यावरील वाहतूक गांधीनगर पोलिसांनी उचगाव हायवे चौकातून सरनोबतवाडी व तावडे हॉटेल अशी वळविली.
गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी गणेश विसर्जन मिरवणूक ही रात्री दहा पर्यंत चालू राहील याची दक्षता घेतली.पीएसआय तेजश्री पवार विवेकानंद राळेभात वैभव पाटील व पोलिसांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.आतापर्यंतच्या इतिहासात उचगावची मिरवणूक पहाटे सहा वाजेपर्यंत अशी तब्बल पंधरा तास चालायची.गेल्यावर्षी ती बाराच्या ठोक्याला बंद करण्यात आली.
गणेश विसर्जन निमित्ताने उचगाव कमानीजवळ रविवारी रात्रीपासूनच आधुनिक साऊंड सिस्टीम,आधुनिक लाईट सिस्टीम बसवून ट्रॅक्टर ट्रॉली सज्ज झाल्या होत्या. एकूण २५ गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. तर मणेरमळा येथे २० सार्वजनिक गणेश मंडळांनी २० सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला.संयुक्त मंगेश्वर मंडळ, ब्रम्हनाथ मंडळ, पंचरत्न, क्लासिक, जय शिवराय तालीम मंडळ, डायमंड, दोस्ती, समर्थ सेवा,रिदम, शिवशक्ती स्पोर्ट्स, छावा ग्रुप, युवा स्पोट्र्स, साई मंदिर गणपती, बालवीर, गुजरी कॉर्नर, हिंदवी,जय महाराष्ट्र, सत्या यासह गणेश मंडळांनी अत्यंत आकर्षक लाईट शो व आधुनिक साऊंड सिस्टीम द्वारे मिरवणुकीत रंगत आणली होती. याबरोबरच ढोल ताशा, विविध मुखवटे घालून आकर्षक डान्स यांनीही मिरवणुकीत रंगत आणली.
दरम्यान, सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मानाचा विडा,नारळ,टोपी आदी देण्यासाठी राजू यादव व यांच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच भाजप पदाधिकारी, शिंदे गट यांच्या वतीने मंडप घालण्यात आले होते. त्यांच्या वतीने मंडळांचा सन्मान करण्यात आला.उचगाव सरपंच मधुकर चव्हाण,ग्रामसेवक दत्तात्रय धनगर व कर्मचारी यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या विसर्जन नदीमध्ये न करता खणीत करण्यासाठी सर्वांनाच जनजागृती करून विसर्जन चांगल्या प्रकारे केले.त्यामुळे उचगाव ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.उचगाव सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला मान्यवरांनी भेट दिली.









