हुतात्म्यांचे स्मरण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सेना (लष्कर) दिनानिमित्त बुधवार, 15 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याच्या अतुलनीय धैर्याचे आणि समर्पणाचे कौतुक केले. भारतीय सैन्य देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या अढळ धैर्याने आणि समर्पणाने उभे आहे. भारतीय सैन्य कोट्यावधी भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करते’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधानांनी भारतीय सैन्याच्या बलिदानाचे स्मरण करतानाच जवानांच्या देशसेवेतील योगदानाचा सन्मान केला.
केंद्र सरकार सशस्त्र दल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. सरकारने केलेल्या सुधारणा आणि आधुनिकीकरणाबद्दल बोलताना त्यांनी ही प्रक्रिया भविष्यातही सुरू राहील, असे सांगितले. पंतप्रधानांनी भारतीय सैन्याची प्रशंसा केवळ सीमांच्या सुरक्षेचे प्रतीक म्हणून केली नाही तर नैसर्गिक आपत्तींमध्ये मानवतावादी मदत पुरवण्यात विक्रम प्रस्थापित करणारी संस्था म्हणूनही केली.
सेना दिनाचे ऐतिहासिक महत्त्व
15 जानेवारी हा भारतीय सेना दिन (आर्मी डे) म्हणून साजरा करण्यामागे एक ऐतिहासिक कारण देखील आहे. 1949 मध्ये याच दिवशी लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा हे भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर यांच्या जागी भारतीय लष्कराचे कमांडर-इन-चीफ बनले होते. नंतर करिअप्पा यांना फील्ड मार्शलची पदवी देण्यात आल्यापासून दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारतीय सैन्याच्या धैर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.









