गुलाम नबी आझादांशी केली तुलना ः बंडखोरी करणाऱयांवर त्वरित कारवाईची मागणी
वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी गेहलोत यांचे कौतुक केले होते. याचाच आधार घेत पायलट यांनी गुलाम नबी आझादांचे मोदींनी कौतुक केल्यावर काय घडले हे सर्व जण जाणत असल्याची टीका केली आहे. पायलट यांनी एकप्रकारे गेहलोत यांची तुलना गुलाम नबी आझादांशी केली आहे.
पंतप्रधानांनी मंगळवारी गेहलोतांचे केलेले कौतुक हे अत्यंत रंजक घडामोड आहे. अशाच प्रकारे पंतप्रधानांनी सभागृहात गुलाम नबी आझादांचे कौतुक केले होते, त्यानंतर कोणत्या घडामोडी घडल्या हे आम्ही सर्वांनी पाहिले आहे. याचमुळे गेहलोतांच्या कौतुकाकडे लहान घटना म्हणून पाहिले जाऊ नये असे म्हणत पायलट यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
राजस्थान काँग्रेसमधील पक्षविरोधी कारवायांप्रकरणी 3 नेत्यांना नोटीस बजावण्यात आली होती. या नेत्यांनी स्वतःची भूमिका मांडल्याचे कळले आहे. आमचा पक्ष हा शिस्तप्रिय असून पक्षात आम्हा सर्वांसाठी नियम समान आहेत. नोटीसवर जलद निर्णय घेतले जावेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारले आहे. शिस्तभंग झाल्याचे मान्य केल्यावरही त्यावर निर्णय घेतला जाऊ नये असे घडू नये असे उद्गार काढत पायलट यांनी गेहलोतांच्या समर्थकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राजस्थानातील नेतृत्व बदलाच्या संदर्भात काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी लवकर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले होते. आम्ही सर्वजण निवडणुकांची तयारी करत आहोत. लवकरच गुजरात निवडणुकीची घोषणा देखील होणार आहे. शिस्तभंगाच्या घटनेची दखल वेणुगोपाल यांनी घेतली असल्याचा दावा पायलट यांनी केला आहे.
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार
कुणाला कुठल्या पदावर नियुक्त करायचे, कुणाला कुठली जबाबदारी द्यायची याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समिती घेणार आहे. राज्यातील निवडणुकीला केवळ 13 महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याचे पायलट यांनी म्हटले आहे.
मोदी-गेहलोत भेट
राजस्थानच्या बांसवाडा येथे मानगढ धाममध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री गेहलोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी गेहलोत यांना देशातील मुख्यमंत्र्यांमध्ये वरिष्ठ संबोधून एकप्रकारे त्यांचे कौतुकच केले होते. तसा मोदी आणि गेहलोत यांच्यात सुमारे 10 मिनिटांपर्यंत एकांतात चर्चाही झाली होती.
राजकीय चढाओढ तीव्र होणार
सचिन पायटल यांनी अशोक गेहलोत यांच्यावर पहिल्यांदाच थेट शाब्दिक हल्ला केला आहे. आतापर्यंत पायलट यांचे समर्थकच गेहलोतांना लक्ष्य करत होते. पायलट यांनी बुधवारी गेहलोतांची तुलना गुलाम नबी आझादांशी केल्याने राजस्थान काँग्रेसमधील नेतृत्वासाठीची चढाओढ अधिच तीव्र होणार असल्याचे मानले जात आहे. राजस्थानमधील सत्ता-पक्ष संघटनेत बदलाची मागणी करणाऱया पायलट यांच्या या विधानामुळे गेहलोत यांचे समर्थकही सक्रीय झाले आहेत. पक्षनेतृत्वासमोर दबावतंत्राचे राजकारण करण्याचा पायलट यांचा प्रयत्न असावा असेही मानले जात आहे.









