प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जागतिक वैद्यकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ माजली. त्याचे पडसाद आजतागायत उमटत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील उणीवा, त्यांची जाणीव साऱया जगाला झाली. डॉक्टरांनी अनंत परिश्रम घेत रुग्णांचे जीव वाचविले. यातून डॉक्टरांचे हे दैवत्व अधोरेखीत झाले, असे गौरवोद्गार जायंट्स मेन्सचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांनी काढले.
कपिलेश्वर रोड येथील जायन्ट्स भवनच्या सभागृहात डॉक्टर्स डेचे औचित्य साधून 5 सेवाभावी डॉक्टरांचा निःस्वार्थी सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सचिव मुकुंद महागावकर, उपाध्यक्ष सुनील मुतगेकर, अविनाश पाटील, जायन्ट्स फेडरेशनचे संचालक अनंत लाड, मधु बेळगावकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ. बसवराज बिजर्गी, डॉ. मदन डोंगरे, डॉ. वसंत कुलकर्णी, डॉ. राजू घोरपडे, डॉ. दीनानाथ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद महागावकर यांनी केले. सुनील मुतगेकर यांनी
आभार मानले. यावेळी मदन बामणे, शिवराज पाटील, पी. आर. कदम, संजय पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.









