वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पुढील वर्षी कतारमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत फिफाकडून एक धाडसी पाऊल उचलले गेले आहे. पुरुषांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत जपानची योशिमी यामाशिता हिची पंच म्हणून नियुक्ती केली आहे. यामाशिताकडून पंचगिरीच्या क्षेत्रामध्ये या स्पर्धेत पदार्पण होत आहे. 2022 साली कतारमध्ये झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत जपानच्या यामाशिताची निवड केली होती. आता येत्या जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी यामाशितासह अन्य पाच महिला फुटबॉल पंचांची निवड करण्यात आल्याची माहिती आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने दिली आहे. आगामी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच 24 संघांचा समावेश राहणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद विद्यमान विजेता कतार भूषवित आहे. जपान, द. कोरिया या दोन संघांनी अलीकडेच कतारमध्ये झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत शेवटच्या 16 संघात स्थान मिळवून दर्जेदार कामगिरी केल्याने या दोन्ही संघांकडून कतारला यावेळी कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. महिलांची आशियाई चॅम्पियन्स लिग स्पर्धा पुढील वर्षापासून घेतली जाणार आहे.









