वार्ताहर /पालये
पालये ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच रंजना परब यांच्या अध्यक्षतेखाली होऊन जैव विविधता तसेच ग्रामविकास समित्या नियुक्त करण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच रूपेश रेडकर, पंचायतसदस्य संदीप न्हानजी, शिवा तिळवे, राधा परब, स्नेहा तुळशीदास गवंडी, पंचायत सचिव प्रीतम सावंत यांची उपस्थिती होती.
नवीन पंचायत मंडळाच्या कारकिर्दीतील ही पहिलीच ग्रामसभा होती व केवळ एकाच ग्रामस्थाचा विकासकामांसंबंधी अर्ज पंचायतीकडे सादर झाला होता. निवडण्यात आलेली ग्रामविकास समिती पुढीलप्रमाणे ः अध्यक्ष सरपंच रंजना परब, सदस्य उपसरपंच रूपेश रेडकर, पंचायतसदस्य शिवा तिळवे, राधा परब, स्नेहा गवंडी, संदीप न्हानजी, सागर तिळवे, समन्वयक नंदकिशोर न्हानजी, नारायण जाधव, शेतकी प्रतिनिधी प्रदीप तिळवे, शिक्षण आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी माजी सरपंच गोपाळ परब, न्यायिक क्षेत्र अनिल तिळवे, एनजीओ सदस्य दत्ताराम पालयेकर, सुमित नाईक, सेल्फ हेल्प ग्रुप प्रतिनिधी रूणाली परब, सेल्फ हेल्प ग्रुप आणि आरोग्य आनंदी तिळवे, एसी सदस्य खेमा हरिजन, शैक्षणिक सदस्य विष्णू परब, सदस्य योगेश हरमलकर, गुरुदास च्यारी, समीर सावळ, प्रवीण पालयेकर. रमेश परब, सखाराम परब, तुळशीदास गवंडी, राजेश परब, रवळू परब.
जैव विविधता समिती ः अध्यक्ष भिवा पांडुरंग परब, सदस्य राधा परब, रंजना परब, खेमा हरिजन, मुकेश परब, शिवा तिळवे, प्रीतम सावंत.
दरम्यान, समित्या निवडल्यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या अर्जावर चर्चा झाली. युवक विष्णू नाईक याचा एकमेव अर्ज या ग्रामसभेत सादर झाला. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये पाणीसमस्या भेडसावत असून त्यासाठी झरीचे तळे दुरुस्तीचा प्रस्ताव त्याने मांडला. एकंदरित संपूर्ण पालये गावातच पाणीसमस्या असून प्रामुख्याने ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना आखा, असे ग्रामस्थांनी सूचविले. व्यायामशाळा सध्या पंचायत हॉलमध्ये चालू असून याला स्वतंत्रपणे जागा उपलब्ध करण्याची मागणीही विष्णू नाईक यांनी केली. पालये क्षेत्रात सरकारच्या जागेत किंवा पडून असलेल्या इमारतीत ही व्यायामशाळा सुरू करावी, अशी त्यांनी मागणी केली. व्यायामशाळेत येणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना ही जागा अपुरी पडते. योग्य सामुग्रीही नसल्याने त्यांची गैरसोय होते. यामुळे व्यायामशाळेला आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठीही पंचायतीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. वीज खांब तसेच गतिरोधकासंदर्भातही त्यांनी सूचना केली. गतिरोधक नसल्याने भोम तसेच देऊळवाडा भागात अपघातांची संख्या वाढत चाललेली असून गतिरोधक उभारणे आवश्यक असल्याचे मत विष्णू नाईक यांनी मांडले. यावर योग्य ती उपाययोजना करणार असल्याचे पंचायत मंडळाने आश्वासन दिले. पाणी पंपावर नियमितपणे कर्मचारी उपलब्ध नसल्याचा आरोप रमेश परब यांनी केला. दीनदयाळ बहुउद्देशीय सभागृहाच्या प्रस्तावाबाबत विचारविनिमय व्हावा, अशी सूचनाही ग्रामस्थांनी केली. शेवटी उपसरपंच रूपेश रेडकर यांनी आभार मानले.









