वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कामासाठी इतर देशांमधील उच्चशिक्षित येऊ नयेत, या उद्देशाने अमेरिकेने स्थलांतरासंबंधीचे नियम किंवा एच वन बी व्हिसासंबंधीच्या अटी कठोर करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला असतानाच दोन विख्यात अमेरिकेन कंपन्यांनी भारतीय वंशाच्या दोन तंत्रज्ञांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर (सीईओ) केली आहे. त्यामुळे त्यांनी ट्रंप प्रशासनाला एक संदेश दिला आहे, अशी चर्चा अमेरिकेत होऊ लागली आहे. श्रीनिवास गोपालन आणि आणि राहुल गोयल अशी या तंत्रज्ञांची नावे आहेत. ते त्यांच्या क्षेत्रांमध्ये प्रवीण आणि अनुभवी असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. गोपालन हे टी-मोबाईल या शक्तीशाली दूरसंचार कंपनीचे सीईओ म्हणून पदभार सांभाळणार आहेत, तर राहुल गोयल यांना मोल्सन कूर्ज या अमेरिकेतील विख्यात पेय कंपनीने सीईओ पद दिल्याने तो मोठ्याच चर्चेचा विषय झाला आहे.
गोपालन हे अहमदाबाद आयआयएमचे विद्यार्थी असून त्यांनी अनेक उद्योगांमध्ये उच्च पदांवर कामे केली आहेत. सध्या ते टी-मोबाईल या कंपनीत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आता सीईओपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत टी-मोबाईल कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांनी केले. गोपालन यांनी पूर्वी हिंदुस्थान युनिलीव्हर, भारती एअरटेल, व्होडाफोन, कॅपिटल वन आणि ड्यूत्शे आदी कंपन्यांमध्ये मोलाची कामगिरी करुन दाखविली आहे. राहुल गोयल हे गेली 24 वर्षे अमेरिकेत विविध औद्योगिक पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी अभियांत्रिकी पदवी भारतातील म्हैसूर येथून मिळविली असून, नंतर उच्च शिक्षण अमेरिकेत पूर्ण केले आहे. मोल्सन कूर्ज ब्रँडची लोकप्रियता अमेरिका आणि इतर देशांमध्येही वाढविण्याच्या कार्यात त्यांचे योगदान असाधारण आहे.









