प्रभारी प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
नदीपात्रावरील पंपसेटचे सर्वेक्षण करून ते हटविण्यासाठी जिल्हापातळीवर टास्क फोर्स समितीची स्थापना करण्याचा निर्णय शनिवारी आलमट्टी येथे झालेल्या सात जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. प्रभारी प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
उन्हाळा किंवा पाणीसमस्या तीव्र झालेली असताना वेगवेगळ्या धरणातील पाण्याचा वापर केवळ पिण्यापुरताच करावा, यासाठी प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आलमट्टी, मलप्रभा, घटप्रभा व हिप्परगी योजनांसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी आलमट्टी येथील कृष्णाभाग्य जल निगमच्या सभागृहात बैठक झाली.
पावसाच्या कमतरतेमुळे बहुग्राम पिण्याच्या पाणी योजना अनेक ठिकाणी स्थगित झाल्या आहेत. अशा गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती बागलकोट व विजापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. आलमट्टी, मलप्रभा, हिडकल व हिप्परगी धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध साठा केवळ पिण्यासाठीच वापरण्याची सूचनाही प्रादेशिक आयुक्तांनी केली.
सध्या कृष्णा नदीत पाण्याची आवक थोड्या प्रमाणात सुरू झाली आहे. हे पाणी कोल्हार (जि. विजापूर) बॅरेजपर्यंत पोहोचेपर्यंत हिप्परगी बॅरेजमधून पाणी सोडले जाणार आहे. घटप्रभा नदीतही अल्पप्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. जुलैअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी हिडकल जलाशयात पाणी साठविण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
शेतीसाठी नदीच्या पाण्याचा वापर करताना राज्य सरकार किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. नदीपात्रावरील पंपसेटचे सर्वेक्षण करून ते हटविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महसूल, पोलीस, पाटबंधारे, वीजमंडळ आदी अधिकाऱ्यांचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या बैठकीत बेळगाव, बागलकोट, विजापूर येथील अधिकारी उपस्थित होते.









