ग्रा. पं. सदस्य-ग्रामस्थांचे जि.पं.ला निवेदन : अनेक कामे खोळंबत असल्याने मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
आंबेवाडी ग्रामपंचायतला मागील काही महिन्यांपासून ग्राम विकास अधिकारी नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तेव्हा कायमस्वरुपी ग्राम विकास अधिकारी नेमावा, अशी मागणी ग्रा.पं. अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन नुकतेच जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना देण्यात आले. तालुक्मयातील नामवंत ग्रामपंचायत म्हणून आंबेवाडी ग्राम पंचायतीकडे पाहिले जाते. उद्योग खात्री योजनेतून विविध विकासकामांना चालना देणारी ही ग्रामपंचायत आता पीडीओविना आहे. त्यामुळे नागरिकांची कामे होणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार पीडीओ पोळ यांच्यावर सोपविण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडेही दोन ग्राम पंचायती असल्याने ते कधी येतात तर कधी नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. ग्राम पंचायतमधील अनेक कर्मचाऱयांचा पगार देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, पीडीओ पोळ यांच्याकडे करडीगुद्दी आणि आंबेवाडी ग्राम पंचायतींचा पदभार दिला आहे. पोळ हे पीडीओची जबाबदारी घेत नसल्याने अनेक विकासकामे खुंटली आहेत. त्यामुळे कायमस्वरुपी पीडीओची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना आर. एम. चौगुले, ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल
आंबेवाडी ग्रामपंचायत पीडीओविना या मथळय़ाखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. याची दखल घेत आता ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी निवेदन देऊन कायमस्वरुपी पीडीओची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.









