जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून यापुढेही आणखी चार दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे संभाव्य पूरस्थितीवर जिल्हा प्रशासनाकडून नजर ठेवण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील कोयना डॅममधून पाणी सोडल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समन्वय साधण्यास व पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास साहाय्य होण्यासाठी कोयना डॅम येथे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाऊस व जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी, तसेच संभाव्य पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती नसल्याने कोणताच धोका नाही. मात्र महाराष्ट्रातून पाणी सोडल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राजापूर बॅरेज, कल्लोळ बॅरेज, हिप्परगी बॅरेजमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रशासन नजर ठेवून आहे. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहून पाऊस व पाण्याची स्थिती जाणून घेतली जात आहे. हिडकल जलाशयातून बुधवारी सायंकाळनंतर पाणी विसर्ग करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. जवळपास 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
चिकोडी, रायबाग, अथणी, कागवाड या तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने स्थानिक तहसीलदारांना व प्रांताधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती घेऊन आढावा घेण्यासाठी सूचना केली आहे. सदर भागावर अधिक नजर ठेवण्यासाठीही सूचना केली आहे. हुक्केरी, गोकाक, मुडलगी तालुक्यातील घटप्रभा नदीवरील गावांवरही नजर ठेवण्यात आली आहे. याठिकाणी कोणताच धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. बळ्ळारी नाल्याच्या पाण्यामुळे गोकाक तालुक्यातील अंकलगी आदी भागात पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा सर्वेक्षण करून अहवाल देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. कुंदरगी येथील अडवीसिद्धेश्वर मठाला पाण्याचा विळखा आला आहे. त्यामुळे मठातील नागरिकांना अंकलगी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
खानापूर तालुक्यावर विशेष नजर
खानापूर तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे या तालुक्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जंगल भागात रस्ते नसल्यामुळे नागरिकांना सुविधा पुरविताना अडचणी येत आहेत. अशा गावांना आवश्यक साधनसामग्री व धान्य पुरविण्याची सूचना तहसीलदारांना करण्यात आली आहे. अत्यंत दुर्गम भागात असणाऱ्या गावांमध्ये औषधोपचार, रेशन पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने याठिकाणी एसडीआरएफची 10 जणांची तुकडी नेमणूक करण्यात येत आहे. यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचीही नेमणूक केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले.
पाऊस-पाणीपातळी पाहूनच सुटीचे नियोजन
गेल्या सहा दिवसांपासून पाऊस सतत कोसळत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. काही भागात संपर्क रस्ते पाण्यामुळे तुटले आहेत. शाळांना सुटी देताना पावसाचे प्रमाण व पाण्याची पातळी पाहून नियोजन केले जात आहे.









