वृत्तसंस्था/दुबई
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने 30 सप्टेंबरपासून खेळविल्या जाणाऱ्या आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत केवळ महिला पंचांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीकडून हा घेतलेला ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. यजमान भारत आणि लंका यांच्यातील सलामीचा सामना गुवाहाटीमध्ये होणार आहे. आयसीसीने गुरूवारी घोषित केलेल्या महिला पंचांच्या यादीमध्ये भारताच्या महिला पंच वृंदा राठी, एन. जननी आणि गायत्री वेणुगोपालन यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारताची माजी महिला क्रिकेटपटू जी. एस. लक्ष्मी हिची या स्पर्धेसाठी सामना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सामना अधिकाऱ्यांच्या पॅनलमध्ये चार सदस्यांचा समावेश आहे. क्लेअर पोलोसॅक, जॅक्वेलिन विलियम्स आणि सू रेडफर्न या सामनाअधिकारी म्हणून काम पाहतील.
या तिघी तिसऱ्यांदा महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काम पाहणार आहेत. लॉरेन अॅजेनबॅग आणि किम कॉटन या दोघी दुसऱ्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सामना अधिकारी म्हणून सेवा बजावतील. क्रिकेट क्षेत्रामध्ये पुरूष आणि महिला यांच्यात अधिक समानता यावी यासाठी आयसीसीने यावेळी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत केवळ महिला पंचांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे आयसीसीचे चेअरमन जय शहा यांनी म्हटले आहे. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात भविष्यकाळात पुरूष आणि महिला यांच्यात भेदभाव दिसणार नाही. भारत आणि लंका यांच्या संयुक्त यजमानपदाने 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 2 नोव्हेंबरला होईल.
सामनाधिकारी-ट्रुडी अँडर्सन, सॅन्ड्रे फ्रित्झ, जी.एस. लक्ष्मी, मिशेल परेरा,
पंच : लॉरेन अॅजेनबॅग, कॅन्डीस ला बोर्डे, किम कॉटन, सारा डॅम्बानेव्हाना, शथिरा जाकीर जेसी, केरीन क्लास्ट, जननी एन., निमाली परेरा, क्लेअर पोलोसॅक, वृंदा राठी, सू रेडफर्न, इलॉइस शेरीडन, गायत्री वेणुगोपालन आणि जॅक्वेलिन विलियम्स.









