प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेत सी ऍण्ड आर नियमावलीप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱयांची भरती करण्यात येत आहे. यानुसार महापालिकेत 3 विभाग करणे आवश्यक आहे. मात्र हे विभाग करण्यापूर्वीच नगरविकास खात्याने बेळगाव महापालिकेसाठी विभागीय आयुक्तांची नियुक्ती केली आहे. विभागीय आयुक्त म्हणून राजशेखर या केएएस श्रेणीतील अधिकाऱयांच्या नियुक्तीचा आदेश बजावला आहे.
कर्मचारी भरती आणि बढती नियमावलीनुसार रिक्त असलेल्या पदांवर अधिकारी आणि कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेत रिक्त असलेली पदे पूर्णपणे भरण्यात आली आहेत. 2011 मध्ये सी ऍण्ड आर नियमावली लागू करण्यात आली होती. यानुसार महापालिका कार्यालयाचे कामकाज 3 विभागात करण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्या दक्षिण आणि उत्तर असे दोन प्रमुख विभाग असून त्यामध्ये 4 उपविभाग करून त्यानुसार कार्यालयीन कामकाज करण्यात येते. पण नव्या नियमावलीनुसार पूर्व, पश्चिम आणि मध्य असे तीन विभाग करण्याची सूचना करण्यात आली आहे. तिन्ही विभागाच्या कार्यालयाचा कारभार पाहण्यासाठी विभागीय आयुक्त हे प्रमुख असणार आहेत. तसेच 3 विभागीय कार्यालयाच्या कामकाजावर नजर ठेवण्यासाठी मुख्य कार्यालय स्थापन करणे गरजेचे आहे. या मुख्य कार्यालयाच्या आयुक्तपदी आयएएस श्रेणीच्या अधिकाऱयांची नियुक्ती करण्याची तरतूद या नियमावलीत आहे.
जबाबदारी देण्याबाबत प्रश्नचिन्ह
सध्या महापालिकेचे कामकाज जुन्याच पद्धतीने सुरू आहे. मात्र नगरविकास खात्याकडून सी ऍण्ड आर नियमावलीप्रमाणे अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यानुसार विभागीय आयुक्तांची नियुक्ती केली आहे. राजशेखर या केएएस श्रेणीतील अधिकाऱयांच्या नियुक्तीचा आदेश बजावला आहे. पण कार्यालयाचे कामकाज जुन्या पद्धतीने सुरू असल्याने या अधिकाऱयावर कोणती जबाबदारी द्यायची, हा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. सध्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्याचा विचार सुरू आहे.









