आयरिश क्रिकेटपटू कॅथरिन डाल्टन बनली मुलतान सुलतान्सची वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आयरिश क्रिकेटपटू कॅथरिन डाल्टनने नवीन पायंडा पाडला असून ती पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) इतिहासातील पहिली महिला प्रशिक्षक बनली आहे तसेच अशा स्तरावरील पुरुष क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारणारी पहिली महिला ठरली आहे. ‘पीएसएल’मध्ये खेळणाऱ्या मुलतान सुलतान्स संघाने आगामी हंगामासाठी 30 वर्षीय डाल्टनची सेवा घेतली आहे. डाल्टनने यापूर्वी ‘मुलतान’च्या काही खेळाडूंसोबत तात्पुरत्या स्वरूपात काम केलेले आहे.
ईसीबी प्रमाणित तिसऱ्या स्तरावरील प्रगत प्रशिक्षक असलेल्या डाल्टनने यापूर्वी ब्रिटनमधील राष्ट्रीय वेगवान गोलंदाजी अकादमी आणि भारतातील अल्टीमेट पेस फाउंडेशनमध्ये प्रशिक्षकपद भूषवलेले आहे. डाल्टनने सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आयर्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे आणि मिडलसेक्स तसेच एसेक्सतर्फे ती कौंटी क्रिकेटही खेळलेली आहे. तिला 2015 मध्ये आयरिश नागरिकत्व प्राप्त झाले. ‘मी अनेक स्तरांवर याबद्दल उत्साहित आहे. अशा विलक्षण खेळाडूंसोबत काम करण्याची संधी मिळणे हे विलक्षण आहे. मी याआधी ज्यांच्यासोबत काम केलेले आहे त्यांच्यासोबत पुन्हा वावरेन’, असे डाल्टनने म्हटले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुऊषांच्या ‘टी20’ संघामध्ये एक महिला महत्त्वाची भूमिका बजावणार ही वस्तुस्थिती असून ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. पुऊषांच्या क्रिकेटमधील पहिली महिला वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक बनणे हे खूप भारावून टाकणारे आहे, असे तिने तिच्या नियुक्तीनंतर मुलतान सुलतान्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.









