नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयात 2 नव्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बऱयाच वर्षांनंतर प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील सर्व 34 पदे भरली गेली आहेत. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुधांशू धुलिया आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जमशेड बुरजोर परदीवाला यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांनी केली.
न्या. परदीवाला हे भारताचे सरन्यायाधीशही नंतर होणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 2 वर्षे 3 महिन्यांचा असू शकतो. सर्वोच्च न्यायालयात आता सर्व 34 न्यायाधीशांची पदे भरण्यात आली असली तरी 10 मे या दिवशी, अर्थात येत्या सोमवारी न्या. विनीत सरण हे निवृत्त होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एक पद रिक्त होणार आहे. ते भरण्याची प्रक्रिया सुरु करावी लागणार आहे.
स्वातंत्र्यसैनिकाचे पुत्र
न्या. धुलिया हे उत्तराखंड उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेले दुसरे न्यायाधीश होत आहेत. ते स्वातंत्र्यसैनिकाचे पुत्र असून 2008 मध्ये त्यांची नियुक्ती उत्तराखंड उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती. नंतर ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले.
चौथे पारसी न्यायाधीश
न्या. परदीवाला हे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले चौथे पारसी समाजातील न्यायाधीश ठरले आहेत. त्यांच्या घराण्यातील ते चौथ्या पिढीतील कायदेतज्ञ आहेत. त्यांचे पिता बुरजोर कावसजी परदीवाला हे काहीकाळ गुजरात विधानसभेचे अध्यक्षही होते. गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आलेले ते पहिलेच अल्पसंख्य समाजातील न्यायाधीशही ठरले आहेत. ऑगस्ट 2021 पासून 11 न्यायाधीशांची नावे सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी सुचविण्यात आली होती. विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वातील न्यायवृंदाने ही नावे सुचविली होती. यांपैकी 9 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.









