सरकारी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणल्याचा पंतप्रधानांचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रोजगार मेळाव्यात 71 हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली. देशभरात 45 ठिकाणी हा मेळा आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सामील झाले होते. नियुक्तीपत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधानांनी तऊणांना संबोधित केले. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये 70 हजाराहून अधिक तऊणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे मिळत आहेत. तुम्हा सर्वांच्या मेहनतीने हे यश मिळाले आहे. मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले.
गेल्या 9 वर्षात आम्ही सरकारी भरती प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि न्याय्य करण्याला प्राधान्य दिले आहे. आज नोकरीसाठी अर्ज करण्यापासून ते निकाल लागण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. तसेच दस्तऐवज स्व-प्रमाणित करणेही पुरेसे आहे. गट क आणि गट ड पदांच्या भरतीसाठी मुलाखती घेण्याची प्रक्रियाही संपवण्यात आलेली आहे. या सर्व प्रयत्नांमुळे भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपुष्टात आल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेले.
9 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 16 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. तेव्हा संपूर्ण देश उत्साहाने आणि विश्वासाने भरून गेला. सबका साथ, सबका विकास या मंत्राने पुढे वाटचाल करणारा भारत आज विकसित भारत होण्यासाठी झटत आहे. आज भारत गतीशीलपणे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या इतिहासात अभूतपूर्व प्रगती करत असल्याचेही मोदी पुढे म्हणाले.
2022 मध्ये रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा
पंतप्रधान मोदींनी ऑक्टोबर 2022 मध्ये रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरू केला. 2023 च्या अखेरीस 10 लाख भरती करण्याचे आश्वासन दिले आहे. याअंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशातील विविध विभागांमध्ये 71 हजार युवकांची भरती करण्यात येत आहे. रोजगार मेळावा हा बेरोजगारांना काम देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा विशेष उपक्रम आहे. रोजगार मेळावा पुढील रोजगार निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा केंद्र सरकारला आहे. तऊणांना काम देण्यासोबतच राष्ट्रीय विकासात सहभागाची संधीही यातून मिळणार आहे.
विविध पदांसाठी भरती
देशभरातून भारतीय डाक सेवक, पोस्टल इन्स्पेक्टर, कमर्शियल-कम-तिकीट लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, कनिष्ठ लेखा लिपिक, ट्रॅक मेंटेनर, साहाय्यक विभाग अधिकारी, निम्न विभाग लिपिक, उपविभाग अधिकारी, कर साहाय्यक, सुरक्षा अधिकारी, फायरमन, साहाय्यक लेखाधिकारी, विभागीय लेखापाल, लेखा परीक्षक, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, साहाय्यक कमांडंट, मुख्याध्यापक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, साहाय्यक निबंधक, साहाय्यक प्राध्यापक अशी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.









