रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देणार : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन
पणजी : सरकारी नोकऱ्यांबरोबरच आज स्टार्टअप आणि विविध योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या कर्जसुलभतेमुळे व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. याचा देशातील युवकांना लाभ होत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून 10 लाख नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या मालिकेतील सहावा राष्ट्रीय ’रोजगार मेळावा’ मंगळवारी देशभरात 43 ठिकाणी आयोजित करण्यात आला. याच मेळाव्याचा भाग म्हणून गोव्यातही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री नाईक बोलत होते. या कार्यक्रमाद्वारे गोव्यात एकुण 126 जणांना तर देशभरातून सुमारे 70 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना नाईक यांनी नवनियुक्त उमेदवारांना शुभेच्छा दिल्या व पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून 10 लाख नोकऱ्या देण्याचे ठेवलेले उद्दिष्ट साध्य होत असल्याचे सांगितले. गोव्यातून रोजगार प्राप्त झालेल्या उमेदवारांमध्ये भारतीय स्टेट बँक 64, बँक ऑफ महाराष्ट्र 14, रेल्वे 30, सीमाशुल्क 8, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग 8, केंद्रीय श्रम मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय प्रत्येकी एक यांचा समावेश होता. पुढे बोलताना श्री. नाईक यांनी, रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने रोजगार मेळावा हे एक पाऊल असून तऊणांना त्यांच्या सक्षमीकरणासह राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली.









