मनपा सफाई कर्मचारी प्रकरण : आयुक्तांच्या घुमजाव भूमिकेमुळे संभ्रम
बेळगाव : महानगरपालिकेमध्ये 138 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती करताना नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. बेकायदेशीररित्या नियुक्ती झाली होती. यामध्ये महानगरपालिकेतील काही नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी संबंधित सफाई कर्मचाऱ्यांकडून रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गदारोळ माजला होता. त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी लोकायुक्तांकडे सोपविण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये याबाबत मनपा आयुक्तांनी घुमजाव केला आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारकडून आता सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी परवानगी देण्यात आली. त्यानुसार सर्वांना कायमस्वरुपी सामावून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार राजू सेठ यांनी सरकारकडे पाठपुरावा करून नियुक्ती केली आहे. मात्र त्यामध्ये काही नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतली आहे. ते आता नामानिराळे झाले आहेत. याबाबत महापालिकेसह शहरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
महानगरपालिकेला सफाई कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. त्यांची नियुक्ती झालीच पाहिजे. याबद्दल कोणाचेच दुमत नाही. मात्र त्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेतो म्हणून रक्कम उकळली आहे, त्याचे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे पोटासाठी पहाटे उठून हे सफाई कर्मचारी काम करत असतात. शहर स्वच्छ करत असतात. त्यांच्याकडूनच अशाप्रकारे रक्कम वसूल करण्यात आली असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी ती नियुक्ती केल्याचे सध्या कार्यरत असलेले आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले आहे. ही गोष्ट खरी असली तरी कोणत्याही नोकरीसाठी किंवा इतर कामांसाठी पैसे घेणे गुन्हा आहे. त्यामुळे अशाप्रकारे संबंधितांना मोकळीक देणे योग्य नाही. या प्रकारावरून यामध्ये महानगरपालिकेतील इतर अधिकारी नगरसेवकही सामील झाले आहेत का? असा संशय निर्माण होत आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक रवी साळुंखे यांनी 138 कामगारांचा प्रश्न उपस्थित केला. मात्र याबाबत इतर नगरसेवकांनी जोरदार आवाज उठविला नाही. काही नगरसेवकांना यामध्ये गैरप्रकार झाला असल्याची माहिती आहे. मात्र त्या सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, पुन्हा ते अडचणीत येवू नयेत यासाठी त्यांनी आवाज उठविला नसल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे कामगारांची पिळवणूक करणारे नगरसेवक आणि अधिकारी मात्र मोकाट आहेत. मात्र हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यापुढेही अशा घटना घडण्याची शक्यता आहे. तेव्हा यासाठी योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.









