हमाल संघटनेचे खासदार प्रियांका जारकीहोळींना निवेदन
बेळगाव : रेल्वेतील हमालांची गँगमन म्हणून नियुक्ती करावी. 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा करावी, अशी मागणी श्री सिद्धारुढ स्वामीजी रेल्वे कुली पोर्टर्स संघटनेने केली आहे. यासंबंधी चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले आहे. 17 ऑक्टोबर 2024 रोजी लखनौ येथे हमालांची राष्ट्रीय बैठक झाली. या बैठकीत हमालांची नियुक्ती गँगमन म्हणून करण्यात यावी, अशी मागणी करीत ठराव मांडण्यात आला होता. केंद्रीयमंत्री व पंतप्रधानांना निवेदन देण्याचेही ठरवण्यात आले होते. यानुसार खासदारांना शनिवारी निवेदन देण्यात आले आहे. वंदे भारत, तेजस रेल्वे सुरू झाल्या आहेत. एस्कलेटरमुळे हमालांवर परिणाम होत आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना हमालांची नियुक्ती गँगमन म्हणून करण्यात आली होती. त्याच पद्धतीने आताही नियुक्ती करावी. अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यासंबंधी मागणी करण्यात आली आहे. अध्यक्ष दावलसाब नदाफ, उपाध्यक्ष चंद्रू चलवादी यांच्यासह संघटनेचे अनेक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.









