गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारला केले सतर्क : फेरविचार करण्याची सूचना
► वृत्तसंस्था/ श्रीनगर
समान नागरी कायद्याबाबत (युसीसी) देशात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कायदा आयोगाने या मुद्यावर देशातील लोक आणि धार्मिक संघटनांकडून मत मागवले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनीही समान नागरी संहितेवर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने सर्व धर्माच्या लोकांचा विचार करून समान नागरी कायद्यासाठी हालचाली सुरू कराव्यात असे त्यांनी म्हटले आहे.
समान नागरी कायद्याला अनुसरून गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी युसीसी लागू करणे हो कलम 370 रद्द करण्याइतके सोपे नाही. केवळ मुस्लीमच नाही तर शीख, ख्रिश्चन, आदिवासी, पारशी, जैन आदी बऱ्याच धर्मियांना नाराज करणे कोणत्याही सरकारसाठी चांगले होणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच समान नागरी कायद्यासाठी पावले उचलताना सरकारने फेरविचार करावा असेही त्यांनी सुचविले. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानेही समान नागरी कायद्याला यापूर्वी विरोध दर्शवला आहे.
निवडणुकीवरही भाष्य
जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांबाबतही आझाद यांनी भाष्य केले आहे. जम्मू-काश्मीरमधील जनता राज्यात लोकशाही व्यवस्था पुन्हा प्रस्थापित होण्याची वाट पाहत आहे. 2018 मध्ये विधानसभा बरखास्त झाल्यापासून आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये कधी निवडणुका होतील याची प्रतिक्षा करत आहोत, असे ते म्हणाले.









