टिळकवाडी, भाग्यनगर येथील रहिवाशांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : अनगोळ नाका, टिळकवाडी येथे भरधाव वेगाने वाहने ये-जा करीत आहेत. यामुळे विद्यार्थी, वयोवृद्धांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या परिसरात गतिरोधक घालावा, अशी मागणी टिळकवाडी व भाग्यनगर येथील रहिवाशांनी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने त्यानंतर गतिरोधक घालण्यात आलेले नाहीत. यामुळे तिसरे रेल्वेगेट येथून वेगाने येणारी वाहने आरपीडी सर्कलकडे निघून जात आहेत. अनगोळ नाका येथे चार रस्ते एकत्रित आल्यामुळे रस्ता ओलांडताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. वाहनांची गती कमी करण्यासाठी गतिरोधकाशिवाय पर्याय नाही. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी अनगोळ नाका येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गतिरोधक घालण्याची मागणी केली आहे. रस्त्याच्या एका बाजूला हेरवाडकर स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, बालिका आदर्श विद्यालय यासह इतर शाळा असल्याने सकाळी व संध्याकाळी अनगोळ नाका येथे विद्यार्थ्यांची गर्दी होते. भरधाव येणारी वाहने विद्यार्थ्यांना लागूनच पुढे सरकत असतात. यामुळे पालकांमधून गतिरोधक घालण्याची मागणी केली जात आहे. गतिरोधक घालण्यासंदर्भात आपण महानगरपालिका व बांधकाम विभागाशी चर्चा करू, असे आश्वासन पोलीस आयुक्त कार्यालयाच्यावतीने देण्यात आले.









