जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
► प्रतिनिधी/ बेळगाव
आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून 10 तर चिकोडी मतदारसंघातून 6 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज हायकमांडकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. दिल्ली आणि बेंगळूर येथे बैठकी घेण्यात आल्या आहेत. येत्या आठवड्याभरात निवडणुकीच्या कामाला गती देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी मंत्र्यांना कोणतेच मापदंड घालून देण्यात आलेले नाही. पक्षाच्या उमेदवारासाठी प्रयत्न करण्यात येतील. 28 लोकसभा मतदार संघांमध्ये विजयी मिळविणे शक्य नाही. त्यामुळे कोणत्याच मंत्र्यांवर कारवाई होणार नाही. ही खोटी बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी एआयसीसी, केपीसीसी व सीएमकडून आंतरिक सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार तयारी करण्यात येत आहे. अयोध्या येथील कार्यक्रमाला न गेल्यास याचा फटका निवडणुकीत बसू शकतो का? असे पत्रकारांनी विचारले असता, निवडणूक व मूर्ती प्रतिष्ठापना हे वेगळे आहे. पंतप्रधान मोदी यांनीच 22 रोजी अयोध्येला न येण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमनंतर अयोध्येला येण्याचे सांगितले आहे. या विषयांमध्ये राजकारण आणणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार शाम घाटगे, बेळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष विनय नावलगट्टी, केपीसीसी सदस्य किरण साधुन्नावर, राजा सलीम बसवराज शेगावी आदी उपस्थित होते.









