सिद्धरामय्या यांच्या हस्ते प्रक्रियेचा होणार शुभारंभ : लाभार्थींना दरमहा मिळणार 2 हजार रुपये
प्रतिनिधी/ बेंगळूर
महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राज्य काँग्रेस सरकारने गृहलक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील मुख्य गृहिणीला दरमहा 2 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेविषयी प्रामुख्याने महिला वर्गात कमालीची उत्सुकता असून 19 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ करतील. महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी बेंगळूरमध्ये याविषयी माहिती दिली.
गृहलक्ष्मी योजनेकरिता नोंदणी करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया निरंतरपण सुरू राहिल. अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही. जर कोणी नोंदणीसाठी पैसे घेत असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. रेशनकार्डावर मुख्य गृहिणी असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच आधारकार्ड सादर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. आधारकार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यात योजनेची रक्कम सरकारकडून जमा केली जाईल, अशी माहिती मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
19 जुलै रोजी एकाच वेळेला सर्वांनी अर्ज भरणा केंद्रांकडे धाव घेऊन रांगेत थांबण्याची गरज नाही. पात्र महिलांना महिला-बालकल्याण खात्याकडूनच मोबाईलवर एसएमएस पाठविला जाईल. त्यात तारीख, वेळ, ठिकाण व इतर माहिती दिली जाईल. त्यामुळे एसएमएस आला तरच अर्ज दाखल करण्यासाठी यावे. ग्रामीण भागातील महिलांना गावातील किंवा नजीकच्या ग्राम वन केंद्र किंवा बापूजी सेवा केंद्रांमध्ये अर्ज दाखल करता येईल. शहरी भागात महिलांना कर्नाटक वन, बेंगळूर वन, बीबीएमपी वॉर्ड कार्यालयांमध्ये अर्ज करता येईल.
सदर योजनेचा प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याच उद्देशाने अर्ज भरणा करण्यासाठी अनुकूल व्हावे, याकरिता ‘प्रजा प्रतिनिधी’ सेवकांची नेमणूक करण्यात येईल. त्यांची नेमणूक करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली जाईल. हे प्रतिनिधी देखील घरोघरी भेट देऊन गृहलक्ष्मी योजनेसाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून नोंदणी करतील.
प्राप्तिकर भरत असेल तर लाभ नाही
नोंदणीसाठी रेशनकार्ड क्रमांक, आधार क्रमांक आणि बँक पासबूक (आधार लिंक असलेले खाते वगळता पर्यायी बँक खात्यावर पैसे जमा व्हायचे असेल तर त्या बँक खात्याचे पासबूक) आवश्यक आहे. गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेणारी महिला किंवा तिचा पती प्राप्तिकर किंवा जीएसटी भरत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
नोंदणीविषयी गोंधळ असल्यास हेल्पलाईन
नोंदणीसाठी दिलेली तारीख, वेळ, ठिकाण याविषयी गोंधळ असल्यास 1902 या हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधावा किंवा 8147500500 या क्रमांकावर एसएमएस पाठविता येईल. एसएमएसमध्ये दिलेल्या तारखेदिवशी नोंदणीसाठी न गेलेल्या महिला त्याच सेवा केंद्रावर अर्ज भरण्यासाठी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत जाऊ शकतात. नोंदणीनंतर अर्ज स्वीकृतीपत्र दिले जाईल. ‘प्रजा प्रतिनिधी’मार्फत नोंदणी केल्यास स्वीकृतीपत्र नंतर घरी पाठविले जाईल.
17 ऑगस्टनंतर लाभार्थींच्या खात्यावर पैसे
आधार लिंक असणाऱ्या लाभार्थींच्या बँक खात्यावर दरमहा 2 हजार रुपये डीबीटीमार्फत (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे) जमा होतील. एखाद्या वेळेस लाभार्थीच्या इच्छेनुसार पर्यायी बँक खात्याचा क्रमांकही नोंदविता येईल. त्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पैसे जमा केले जातील. 17 ऑगस्टनंतर लाभार्थींना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ मिळणार आहे.
कोट्स……
प्रजा प्रतिनिधी काँग्रेसचे कार्यकर्ते नव्हेत!
‘प्रजा प्रतिनिधी’ ही व्यवस्था काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी नसून लोकांच्या हितासाठी आहे. सरकारकडून निवड झालेले स्वयंसेवक या योजनेसाठी काम करतील. त्यांच्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश नाही. प्रजा प्रतिनिधी निवडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली समिती स्थापन केली आहे.
– लक्ष्मी हेब्बाळकर, महिला-बालकल्याण मंत्री









