पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालानंतर मंडळाकडून जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे.
इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून 29 मे ते 9 जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येतील. तर विलंब शुल्कासह 10 जून ते 14 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येतील. उच्च माध्यमिक शाळांनी किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा 1 ते 15 जून अशा आहेत. तर शुल्क भरण्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळामध्ये जमा करण्याची तारीख 16 जून ही आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाईन घेता येईल. श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2023 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट व फेब्रुवारी-मार्च 2024 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.








