प्रतिनिधी / बेळगाव
यमकनमर्डी मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार माऊती तिप्पान्ना नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून म. ए. समितीचा उमेदवार उतरल्यामुळे अनेक राष्ट्रीय पक्षांना हादरा बसला असून त्यांच्या विजयासाठी आता कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
मारुती नाईक हे सेवानिवृत्त सैनिक आहेत. यमकनमर्डी मतदारसंघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हुक्केरी येथील समाज कल्याण अधिकारी कार्यालयात नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे. तब्बल 15 वर्षांनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने यमकनमर्डी मतदारसंघातून आपला अधिकृत उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे यमकनमर्डी मतदारसंघातील मराठी जनतेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. यावेळी उमेदवार माऊती तिप्पान्ना नाईक यांच्यासह उदय कलघटकर, सूरज कणबरकर, आनंद पाटील, रजनीश आचार्य, महेश सावी आणि इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यमकनमर्डी मतदारसंघातून मारुती नाईक यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळू लागला आहे. या मतदारसंघामध्ये मराठी भाषिकांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना सर्वत्र पाठिंबा मिळत असून राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना आता प्रचारासाठी कंबर कसावी लागणार आहे.









