मराठी भाषिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : भगवे फेटे-झेंड्यांनी वातावरण समितीमय

खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांनी सोमवारी भव्य मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समितीप्रेमी मराठी भाषिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मराठी बाण्याचे दर्शन घडविले. खानापूर तालुका म. ए. समितीत एकीनंतर उत्साहाचे वातावरण आहे. मुरलीधर पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर समिती कार्यकर्त्यांत जल्लोष सळसळत आहे. याचे प्रत्यंतर अर्ज दाखल करताना दिसून आले. कार्यकर्ते स्वत:हून स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजता चौराशीदेवी मंदिर येथे एकत्र जमल्यानंतर सीमा सत्याग्रही नारायण लाड, शंकरराव पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, उमेदवार मुरलीधर पाटील, अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या हस्ते चौराशीदेवी व शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधून भगवे झेंडे हाती घेतले होते. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में’, ‘मराठी अस्मिता व संस्कृती जपण्यासाठी समितीला विजयी करा’, अशा घोषणांनी तसेच ढोल-ताशाच्या गजरात व वारकऱ्यांच्या भजनाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध मार्गांवरून ही मिरवणूक शिवस्मारक येथे आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यानंतर तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला. माजी आमदार दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील, अध्यक्ष गोपाळराव देसाई, सचिव सीताराम बेडरे, आबासाहेब दळवी यांनी निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी बेळगाव युवा समितीचे कार्यकर्ते, नगरसेवक, उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीमासत्याग्रहींची युवकांना आर्त हाक
आयुष्यभर सीमा चळवळीशी प्रामाणिक राहून सीमाप्रश्न सुटण्याचे स्वप्न उराशी बाळगून सतत महाराष्ट्रात जाण्याचा ध्यास घेतलेले सीमासत्याग्रही मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांनी मराठी युवकांना समितीच्या पाठिशी एकनिष्ठ राहून सीमाप्रश्न सोडवून घ्या, आणि आमचे स्वप्न पूर्ण करा, अशा आशयाचे फलक हाती घेतले होते. मराठी माणसा जागा हो, समितीचा धागा हो, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी आम्ही समितीचे पाईक, लढा मराठी अस्मितेचा ध्यास अस्मितेचा, ‘आमिषाला नका घालू भीक तुमच्या-आमच्यासाठी समितीच ठीक’ अशा आशयांचे फलक लक्ष वेधून घेत होते. तळपत्या उन्हातही मराठी भाषिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मुरलीधर पाटील यांना क-नंदगड ग्रामस्थांचा पाठिंबा

नंदगड : कसबा नंदगड येथे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारात गावातील नागरिकांनी सहभाग दर्शविला. त्यानंतर झालेल्या बैठकीलाही मोठा प्रतिसाद लाभला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक टी. वाय. पाटील होते. यावेळी म. ए. समितीचे सचिव एस. एन. बेडरे, नेते महादेव घाडी, राजाराम देसाई, ऊक्माण्णा झुंजवाडकर, पुंडलिक पाटील, प्रवीण पाटील, विठ्ठल गुरव, म्हात्रू धबाले, परशराम चोपडे, भीमसेन करंबळकर, कृष्णा कुंभार, मधु पाटील, दशरथ पाटील, यल्लाप्पा पाटील, महादेव पाटील, नितीन पाटील, हणमंत पाटील, मोहन पाटील, बबन पाटील, सातेरी पाटील, नागो पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. म. ए. समितीचे पदाधिकारी राजाराम देसाई यावेळी म्हणाले, मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना प्रचंड मते देऊन विजयी करा, असे आवाहन केले. यावेळी महादेव घाडी, टी. वाय. पाटील व अन्य प्रमुख नेते मंडळींची भाषणे झाली. कसबा नंदगड गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उमेदवार मुरलीधर पाटील यांनी यावेळी बोलताना दिले.









